मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील एकाही घटक पक्षाला विधानसभेत विरोधी पक्ष नेते पदासाठी आवश्यक संख्याबळ मिळाले नाही. त्यामुळे आघाडीतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि काँग्रेस या प्रमुख पक्षांनी मिळून संयुक्तरित्या विरोधी पक्ष नेते पदाचा दावा केला होता. अखेर या पदासाठी उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या नावाची शिफारस विधानसभा अध्यक्षांकडे करण्यात आली आहे.
याबाबत प्रतिक्रिया देताना आमदार भास्कर जाधव यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, “विधानसभेतील विरोधी पक्ष नेते पदासाठी महाविकास आघाडीच्या वतीने विधानसभा अध्यक्षांकडे माझ्या नावाचे पत्र देण्यात आले आहे. मात्र अधिवेशन कमी दिवसांचे असल्यामुळे केवळ घोषणा करून पुढील अधिवेशनात नियुक्ती केली तरी लोकशाहीची प्रतिष्ठा अबाधित राहील.” त्यांनी यावेळी सत्ताधारी पक्षावरही तोफ डागली आणि लोकशाहीचे भान राखण्याचे आवाहन केले.
विरोधी पक्ष नेते पदासाठी वेगवेगळी नावे चर्चेत होती. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि आमदार आदित्य ठाकरे यांचे नावही या शर्यतीत होते. मात्र, शेवटी भास्कर जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. काही दिवसांपूर्वी भास्कर जाधव यांनी माध्यमांशी संवाद साधताना नाराजी व्यक्त करत आपल्याला क्षमतेनुसार काम करण्याची संधी मिळत नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे त्यांचे पक्षांतर होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, त्यांनी स्वतःच ही शक्यता फेटाळून लावली होती.
भास्कर जाधव यांची नाराजी दूर करण्यासाठी आणि त्यांच्या अनुभवाचा फायदा उठवण्यासाठी त्यांच्यावर विरोधी पक्ष नेते पदाची जबाबदारी सोपवण्यात आल्याचे मानले जात आहे. आता विधानसभेत विरोधी पक्षाची भूमिका कशी राहते आणि सत्ताधारी पक्ष यावर कशा प्रकारे प्रतिक्रिया देतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.