
मुंबई-वृत्तसेवा | राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपताच निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट झाले आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकृत माहितीनुसार, २,८६९ नगरसेवक पदांसाठी आता १५,९३१ उमेदवार निवडणूक मैदानात उतरले आहेत. मुंबईत सर्वाधिक उमेदवार असून, नव्याने महापालिकेचा दर्जा मिळालेल्या इचलकरंजी आणि जालन्यात प्रथमच मतदान होणार असल्याने तेथे विशेष उत्सुकता आहे.

राजधानी मुंबईत २२७ जागांसाठी सुमारे १,७०० उमेदवार नशीब आजमावत आहेत. पुण्यात १६५ जागांसाठी १,१६६ उमेदवार रिंगणात असून, शेवटच्या टप्प्यात मोठ्या प्रमाणावर माघारी झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली. उपराजधानी नागपुरात १५१ जागांसाठी ९९३ उमेदवार निवडणूक लढवत आहेत.
निवडणूक प्रक्रियेच्या सुरुवातीला राज्यभरातून मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. वैध ठरलेल्या अर्जांपैकी तब्बल ८,८४० उमेदवारांनी माघार घेतली. त्यात पुणे शहर आघाडीवर असून, त्याखालोखाल छत्रपती संभाजीनगर आणि मुंबईचा क्रमांक लागतो. तुलनेने इचलकरंजी महापालिकेत सर्वात कमी उमेदवार मैदानात आहेत.
दरम्यान, राज्यभरात ७० जागांवर बिनविरोध निवडी झाल्याने राजकीय तापमान चढले आहे. या निवडींवर न्यायालयीन आव्हान शक्य आहे का, यावर कायदेतज्ज्ञांमध्ये वेगवेगळी मते व्यक्त होत आहेत. माघारीसाठी दबाव होता, हे ठोस पुराव्याने सिद्ध करणे कठीण असले तरी, निवडणूक आयोगाची पुढील भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.



