
पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा शहराच्या नुराणी नगर परिसरात एक धक्कादायक चोरीची घटना उघडकीस आली आहे. बँकेतून काढलेली २ लाख रुपयांची रोकड मोपेडच्या डिक्कीतून अज्ञात चोरट्यांनी पळवली आहे. या चोरीची पद्धत पाहून पोलिसही चक्रावून गेले आहेत. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. विशेष म्हणजे ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, एका अल्पवयीन मुलासह एकूण तीन चोरटे यात दिसले आहेत. या प्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बँकेतूनच होता पाळत
पाचोरा येथील एका शाळेचे मुख्याध्यापक यांनी २५ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता शहरातील जे.डी.सी.सी. बँकेतून २ लाख रुपये काढले. त्यांना ही रक्कम शाळेच्या कामासाठी आणि काही बांधकाम मजुरांना द्यायची होती. त्यांनी काढलेली ही रक्कम सेवावृत्त शिक्षक शेख खलिल शेख नुरा यांच्याकडे सुरक्षित ठेवण्यासाठी दिली. शेख नुरा यांनी ही रक्कम त्यांच्या मोपेडच्या डिक्कीत ठेवली आणि घराकडे निघाले. मात्र, त्यांना हे माहीत नव्हते की बँकेतूनच एक चोरटा त्यांच्यावर पाळत ठेवून होता.
‘फिट’चा बनाव आणि पोलिसांना चकमा
घरी पोहोचल्यावर शेख नुरा यांनी मोपेड घराच्या कंपाऊंडमध्ये लावली. त्याचवेळी, रस्त्यावर एका लहान मुलाने ‘फिट’ आल्याचा बनाव केला. त्याला मदत करण्यासाठी शेख नुरा धावले. याच संधीचा फायदा घेत, मोटरसायकलवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांना घरातून पाणी आणण्यास सांगितले. शेख नुरा पाणी आणायला घरात गेले आणि चोरट्यांनी मोपेडच्या डिक्कीतील रोकड लंपास केली. या तिघांनी तात्काळ घटनास्थळावरून पळ काढला. शेख नुरा यांनी तात्काळ पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.



