नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी अधिसूचना प्रसिद्ध होत असून याच दिवसापासून इच्छुकांना उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. २०१८ मध्ये या मतदारसंघात ५३ हजार ८९२ मतदार होते. यावेळी डिसेंबर २०२३ अखेर ही संख्या ६४ हजार ८०२ पर्यंत गेली. मतदार नोंदणीसाठी ५५३९ अर्ज प्राप्त झाले असून त्यावर निर्णय झाल्यानंतर अंतिम मतदारसंख्या आणखी वाढणार आहे. मतदार नोंदणीत अहमदनगर जिल्ह्यातून अधिक जोर लावण्यात आल्याचे दिसत आहे.
लोकसभेपाठोपाठ विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षण मतदार संघाची निवडणूक होत आहे. अधिसूचना प्रसिध्द झाल्यानंतर ३१ मे ते सात जून या कालावधीत उमेदवार अर्ज दाखल करता येणार आहेत. २६ जूनला मतदान होणार आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदार संख्येत सुमारे ११ हजारने वाढ झाली. प्राप्त झालेले अर्ज मंजूर झाल्यास ही संख्या आणखी साडेपाच हजारांनी वाढणार आहे. नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव व नंदुरबार या जिल्ह्यातील शिक्षक या निवडणुकीत मतदान करतील. मतदान नोंदणीकडे अहमदनगर जिल्ह्यातील शिक्षकांनी प्राधान्याने लक्ष दिल्याचे दिसत आहे.
विहित मुदतीत प्राप्त झालेल्या अर्जात ३११५ अर्ज एकट्या या जिल्ह्यातील आहेत. गेल्यावेळी नाशिकच्या तुलनेत नगरमधील मतदारांची संख्या साधारणत: दीड हजाराने कमी होती. यावेळी नगरमधून मतदारांच्या संख्येतील तफावत भरून काढण्याची धडपड झाल्याचे दिसून येते. परंतु, नाशिक जिल्ह्यातून २१८३ मतदारांनी अर्ज भरले आहेत. त्यामुळे मंजुरीनंतर दोन्ही जिल्ह्यातील मतदार संख्येत फार तफावत राहणार नसल्याचा अंदाज आहे. जळगावमधून सर्वात कमी म्हणजे ५३, धुळे ८०, नंदुरबारमधून १०३ मतदार नोंदणी अर्ज यंत्रणेकडे प्राप्त झाले आहेत. या अर्जावर निर्णय होऊन अंतिम मतदार यादी प्रसिध्द केली जाईल.
शिक्षक मतदारसंघात पाच जिल्ह्यांचा समावेश असला तरी या निवडणुकीसाठी इच्छुकांना नाशिकरोड येथील विभागीय आयुक्त कार्यालयात उमेदवारी अर्ज सादर करावा लागणार आहे. उमेदवारांना अर्जासोबत खुल्या गटासाठी १० हजार तर, अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गासाठी पाच हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे. उमेदवाराचे नाव विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीत असणे आवश्यक आहे. तसेच सूचक वा प्रस्तावकाचे नाव शिक्षक मतदारसंघाच्या यादीत असणे बंधनकारक असल्याचे उपायुक्त (प्रशासन) विठ्ठल सोनवणे यांनी सांगितले.
डिसेंबर २०२३ मध्ये प्रसिध्द झालेल्या अंतिम मतदार यादीनुसार नाशिक जिल्ह्यात २३ हजार ५९७, धुळे जिल्ह्यात ८०८८, जळगाव १३ हजार ५६, नंदुरबार ५४१९ आणि नगर जिल्ह्यात १४ हजार ६४२ याप्रमाणे एकूण ६४ हजार ८०२ मतदारांची नोंदणी झाली आहे. नव्याने ५५३९ मतदार नोंदणी अर्ज प्राप्त झाले. हे अर्ज मंजूर झाल्यास मतदारांची एकूण संख्या ७० हजारावर जाण्याची शक्यता आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदारसंख्या १६ हजारांनी वाढणार आहे.