यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नाशिक येथे प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय कार्यक्रमादरम्यान केलेल्या भाषणात भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव जाणीवपूर्वक टाळल्याचा आरोप करत यावल तालुक्यात आंबेडकरी संघटनांनी तीव्र निषेध नोंदवला आहे. या प्रकरणी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याविरुद्ध अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा १९८९ तसेच भारतीय दंडसंहितेतील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

यावलचे तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना आंबेडकरी चळवळीतील विविध संघटना, बौद्ध समाज बांधव व सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, “डॉ. आंबेडकर यांचे नाव न घेणे हा केवळ विसर नसून संविधानाचा व आंबेडकरी समाजाच्या भावना दुखावणारा प्रकार आहे.”

प्रजासत्ताक दिनासारख्या राष्ट्रीय महत्त्वाच्या दिवशी संविधाननिर्मात्याचा उल्लेख टाळला जाणे हे दलित-वंचित समाजाच्या आत्मसन्मानाला धक्का देणारे असल्याची भावना आंदोलकांनी व्यक्त केली. दरम्यान, कार्यक्रमस्थळी वनविभागातील कर्मचारी माधवी जाधव व दर्शना सौपुरे यांनी या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित केल्याचेही निवेदनात नमूद असून, त्यांच्या धैर्याचे संघटनांकडून कौतुक करण्यात आले आहे.
प्रशासनाने या प्रकरणी तातडीने दखल न घेतल्यास राज्यभर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनांनी दिला आहे. “बाबासाहेबांचा अपमान सहन केला जाणार नाही,” अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी जाहीर केली.
या निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष भगवान मेघे, ऑल इंडिया पँथर सेनेचे तालुका अध्यक्ष सतीश अडकमोल, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत इंगळे, लक्ष्मी मेंढे, सुपडू संदनशिव, नसीर खान, विकी वानखेडे, अरुण गजरे, मिलिंद जंजाळे, किरण तायडे, नितीन बोरेकर, विजय बाविस्कर, विनोद सोनवणे, सिद्धार्थ अडकमोल, बाळू अडकमोल, नरेंद्र अडकमोल यांच्यासह समता सैनिक दलाच्या महिला कार्यकर्त्या व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.



