
जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ असलेल्या समर्थ नगरात घरासमोर चिखल लोटल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका कुटुंबातील सदस्यांनी दोन तरुणांना लाकडी काठीने व चापटबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची गंभीर घटना लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घडली आहे. या मारहाणीत दोन्ही तरुण जबर जखमी झाले असून, याप्रकरणी बुधवारी (२२ ऑक्टोबर) मध्यरात्री एमआयडीसी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरेश सुखदेव भुसारे (वय ४७, रा. समर्थ नगर, गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, मंगळवार, २१ ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दुपारी ४ वाजताच्या सुमारास सुरेश भुसारे हे पत्नी लताबाई यांच्यासह घरी होते. त्यांचे मुलगे हेमंत व प्रशांत भुसारे हे फटाके घेऊन घरी आले होते. त्याच वेळी त्यांच्या घरासमोर राहणाऱ्या सुनीताबाई सावंत या रस्त्यावरील ओला चिखल जमा करून तो भुसारे यांच्या घराच्या दिशेने लोटत होत्या.
हा प्रकार पाहून मुलगा हेमंत याने सुनीताबाई सावंत यांना नम्रपणे ‘चिखल आमच्या घराकडे लोटू नका’ असे सांगितले. हेमंतने केलेले हे विधान सुनीताबाई यांना आवडले नाही आणि त्यातून वादाला तोंड फुटले. काही वेळातच सुनीताबाई यांचे पती प्रमोद सावंत, मुलगे भावेश प्रमोद सावंत आणि कल्पेश प्रमोद सावंत यांनी घटनास्थळी धाव घेतली.
संतप्त झालेल्या प्रमोद सावंत, भावेश आणि कल्पेश यांनी भुसारे यांचे मुलगे हेमंत आणि प्रशांत यांना शिवीगाळ करत चापट-बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. या हाणामारीत कल्पेश सावंत याने थेट लाकडी काठीचा वापर केला आणि प्रशांत भुसारे याच्या डोक्यात गंभीर दुखापत केली. दोन्ही तरुणांना झालेल्या या मारहाणीमुळे समर्थ नगरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
गंभीर जखमी झालेल्या प्रशांतला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर सुरेश भुसारे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी प्रमोद सावंत, भावेश सावंत आणि कल्पेश सावंत यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास एमआयडीसी पोलीस करत आहेत.



