जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा कारागृहाच्या आतमध्येच कैद्यांकडून दुसऱ्या कैद्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी जखमी कैद्याने दिलेल्या तक्रारीवरून शनिवारी (२७ सप्टेंबर) सायंकाळी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दोन कैद्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारागृहाच्या आतमध्येच झालेल्या या घटनेमुळे तेथील सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोहम गोपाल ठाकरे (वय २०) हा कैदी शनिवार, २७ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास कारागृहातील बॅरेक क्रमांक १३ जवळ उभा होता. काहीही कारण नसतांना शिक्षा भोगत असलेले कैदी कुणाल गोपाल चौधरी आणि अजय मोरे या दोघांनी सोहम ठाकरे याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. शिवीगाळानंतर त्यांनी सोहम ठाकरे याला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. दोघांनी मिळून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्यामुळे सोहम ठाकरे याला गंभीर दुखापत झाली आहे.

सोहम ठाकरे याने सायंकाळी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात येऊन मारहाण करणारे कैदी कुणाल गोपाल चौधरी आणि अजय मोरे यांच्याविरोधात फिर्याद दिली. त्यानुसार, दोन्ही आरोपी कैद्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारागृहासारख्या अतिसुरक्षित ठिकाणी अशा घटना घडणे गंभीर बाब असून, या घटनेमुळे कैद्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक फौजदार सोनवणे हे करीत आहे.



