Home Cities अमळनेर पाडळसरे येथे ग्रामदैवत कानबाई मातेचा उत्सव ; मिरवणूकीनंतर कानबाईचे विसर्जन

पाडळसरे येथे ग्रामदैवत कानबाई मातेचा उत्सव ; मिरवणूकीनंतर कानबाईचे विसर्जन


अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । खान्देशातील महत्त्वाचा मानला जाणारा ग्रामदैवत कानबाई मातेचा उत्सव अमळनेर तालुक्यातील पाडळसरे येथे मोठ्या हर्षोल्हासात साजरा करण्यात आला. शनिवारपासून सोमवारपर्यंत सलग तीन दिवस चाललेल्या या उत्सवासाठी गावाबाहेर कामानिमित्त गेलेले भाऊबंदकीतील लोक आपल्या परिवारासह गावात दाखल झाले होते, त्यामुळे गावाला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.

या कानबाई उत्सवासाठी तीनही दिवस महिला आणि नागरिक मोठ्या लगबगीने सहभागी झाले होते. कानबाईच्या पूजनासाठी जोडप्यांनी रांगा लावून दर्शन घेतले. कानबाईची भजनं आणि गायनाचा कार्यक्रम काल रात्रभर सुरू होता. प्रत्येक भाऊबंदकीतील महिला आणि पुरुषांनी कानबाईजवळ गाऊन, संगीत तालावर नाचत जागरण केले.

आज, श्रावणातील पहिल्याच सोमवारी, सकाळी ७ वाजल्यापासून कानबाई विसर्जनाची लगबग सुरू होती. महिला आणि मुलींनी आपापल्या खान्देशी पारंपरिक वेशभूषेत कानबाईचे पूजन करून, प्रसाद वाहून पारंपरिक सवाद्य विसर्जन मिरवणुकीला सुरुवात केली. गावातील घराघरातून सुवासिनींनी कानबाईचे पूजन केले. चौकाचौकात भजनी मंडळे, डफ आणि ढोल-ताशांच्या गजरात गावकरी कानबाईच्या गाण्यांवर आणि संगीताच्या तालावर बेभान होऊन नाचत होते.

पुनर्वसन गावातील मिरवणूक हनुमान मंदिर आणि मरीआईपासून जुन्या पाडळसरे गावात गेली. तिथे ग्रामदैवत अंबिका मातेच्या मंदिरात गावातील सर्व कानबाईंचे एकत्रित सामूहिक पूजन आणि आरती झाली. त्यानंतर मिरवणूक पुन्हा जुन्या गावभर फिरून तापी नदीकाठावरील नाटेश्वर महादेवासमोर कानबाईला विश्रांती देण्यात आली. अखेरीस, तापी-बोरी-अनेर नदीच्या त्रिवेणी संगमावरील तीरावर उपस्थित सर्व गावकऱ्यांनी आरती करून, तापी नदीच्या संगम पाण्याच्या प्रवाहात कानबाई मातेला तापी तीर्थ दाखवून, मोठ्या मनाने “कानबाई माता की जय” म्हणत विसर्जन केले.


Protected Content

Play sound