हैदराबाद (वृत्तसंस्था) हैदराबादमधील सरकारी पशुवैद्यकीय रुग्णालयातील महिला डॉक्टरला जिवंत जाळले असल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. धक्कादायक म्हणजे आरोपींनी पिडीत महिला डॉक्टरला पेटवण्यापूर्वी बलात्कार केला असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
गुरुवारी सकाळी दूधविक्रेते एस. सत्यम यांना हैदराबाद-बेंगळुरू मार्गावरील उड्डाणपुलाखाली जळालेल्या अवस्थेत एक मृतदेह दिसला. यानंतर स्थानिक पोलिस घटनास्थळी पोहचले. यानंतर सायबराबाद पोलिसांनी बेपत्ता व्यक्तींबाबत माहिती घेतली असता बुधवारी रात्रीपासून एक डॉक्टर महिला बेपत्ता असल्याची माहिती मिळाली. त्यांच्या कुटुंबीय घटना स्थळी पोहोचल्यानंतर स्कार्फ आणि लॉकेटवरून त्यांनी मृतदेहाची ओळख पटवली. महिला डॉक्टरच्या बहिणीने माहिती दिली की, तिची बहिण रुग्णालयात जाण्यासाठी घरातून बाहेर पडली होती. परंतू तिच्या दुचाकीत बिघाड झाल्याचे तिने मला कळवले होते. तसेच काही लोक मदत करत असल्याचेही तिने सांगितले होते. मात्र, नंतर कुटुंबीयांनी फोन केल्यानंतर तिचा फोन बंद होता. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी एक ट्रक चालक आणि क्लीनरला ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहेत.