पुणे (वृत्तसंस्था) तपास यंत्रणांचा धाक दाखवून सत्ताधारी इतर पक्षांमधील नेत्यांना सत्तांतरासाठी धमकावत आहेत आणि हे सूड आणि दबावाचे राजकारण लोकशाहीसाठी घातक आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वत: आमदारांना फोन करत असल्याचा थेट आरोपही पवार यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे फोडाफोडीचे राजकारण करत आहेत. महाराष्ट्रातील निवडणूक तोंडावर आलेली असताना हे प्रकार केले जात आहेत. विरोधी पक्षातील आमदारांना ईडीच्या कारवाईची धमकी दिली जाते आहे असाही आरोप त्यांनी केला. एवढेच नाही तर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्राकडूनही सत्तेचा गैरवापर केला जातो आहे. महाराष्ट्रातील विरोधी पक्षातल्या नेत्यांना पक्षांतर करण्यासाठी धमकावले जातं आहे, असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.
हसन मुश्रीफ यांच्यावर रेड पडली. त्यांना भाजप मध्ये या असे सांगण्यात आले होते. ते त्यांनी मान्य केले नाही. म्हणून रेड करण्यात आली. पंढरपूर मधील कल्याण काळे यांचा साखर कारखाना अडचणीत होता. राज्य सरकारने नियम सोडून 30 – 35 कोटी दिले. पण त्यांना अट घातली पक्षांतर करा. त्यांना संस्था टीकवायची होती. त्यांनी पक्षांतर केले. छगन भुजबळ यांच्या बाबतीतही तेच करण्यात आले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष देखील महाराष्ट्र सदनात बैठका घेतात. त्यासाठी राज्य सरकारचा एक ही रुपया गेलेला नाही. महाराष्ट्र सदनाचा निर्णय मंत्रीमंडळाने घेतला आहे. तरीही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.