बुलढाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यामध्ये टक्कल व्हायरसमुळे भीतीचे वातावरण आहे. जवळपास १२ ते १५ गावांत केस गळती आणि टक्कल पडण्याचा प्रकार समोर आला आहे. आता १५ दिवस उलटले आहे मात्र तरीही आरोग्य प्रशासनाला याच्या कारणाचा अद्यापही ठाव ठिकाणा लागला नाही. तर निदान करण्यातही आरोग्य प्रशासन अद्याप अपयशी ठरले आहे.
त्यामुळे आज केंद्र सरकारच्या सर्वोच्च आरोग्य संस्थेचे अर्थात इंडियन कॉन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे पथक या परिसरात दौरा करणार आहे. साधारणत: दुपारी १२ वाजता हे पथक या परिसरात दाखल होणार आहे. हे पथक केस गळतीच्या कारणांचा शोध घेणार आहे. सुरुवातीला हे फंगल इन्फेक्शन किंवा पाण्यामुळे केस गळती होत असल्याचे सांगण्यात येत होते मात्र अद्यापही आरोग्य प्रशासनाला याचे निदान करणे शक्य झालेले नाही.
गेल्या दोन आठवड्यांपासून शेगाव तालुक्यातील जवळपास १५ गावांमध्ये केस गळती आणि टक्कल पडण्याचा प्रकार सुरूच आहे. आरोग्य प्रशासनाने या परिसरात सर्वेक्षण सुरू करून तात्पुरता उपचारही केला आहे. मात्र अद्यापही केस गळती सुरूच असून काल मिशी आणि हातावरील केस गळण्याचे काही रुग्ण समोर आल्याची माहिती आहे. त्यामुळे नेमका हा कुठला आजार आहे यावर ठोस अद्यापही आरोग्य प्रशासनाला सांगता येत नाही.