Home क्राईम गोमांस विक्री प्रकरणी पिता-पुत्र अटकेत ; १७५ किलो मांस जप्त

गोमांस विक्री प्रकरणी पिता-पुत्र अटकेत ; १७५ किलो मांस जप्त


 रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील रसलपूर गावात गोवंश कत्तल करून गोमांस विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला असून रावेर पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने टाकलेल्या धाडीत मोठ्या प्रमाणात मांस जप्त करण्यात आले आहे. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार झाला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांना गुप्त माहितीदारामार्फत माहिती मिळाली होती की रसलपूर गावातील कुरेशी मोहल्ल्यात गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करून गोमांस विक्री सुरू आहे. या माहितीच्या आधारे १० मार्च २०२६ रोजी सकाळी लवकर रावेर पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने त्या ठिकाणी छापा टाकला. पोलिसांनी परिसरात पाहणी केली असता शेख युसुफ शेख अय्युब कुरेशी (वय ५०) आणि शेख सानिफ शेख युसुफ कुरेशी (वय २५) हे पिता-पुत्र गोवंश जातीच्या जनावरांचे मांस कापून विक्री करताना आढळून आले.

पोलिसांना पाहताच दोन्ही आरोपींनी गल्लीबोळांचा फायदा घेत पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून सुमारे २६ हजार रुपये किमतीचे अंदाजे ९३० किलो गोवंश जातीच्या जनावरांचे मांस तसेच धारदार कोयता जप्त करण्यात आला.

दरम्यान, कारवाईदरम्यान गुन्हे शोध पथकातील इतर कर्मचारी कुरेशी मोहल्ल्यातील शेख नुरा शेख मुनीर यांच्या घराजवळ पोहोचले असता तेथे पत्र्याच्या शेडमध्ये पिवळा फड बांधून त्यामध्ये शेख नईम शेख अय्युब कुरेशी हा गोवंश कत्तल करून विक्री करताना दिसला. मात्र पोलिस पथक जवळ पोहोचण्यापूर्वीच त्याने गल्लीबोळाचा फायदा घेत घटनास्थळावरून पलायन केले. त्या ठिकाणाहून सुमारे ५ हजार रुपये किमतीचे २५ किलो गोमांस आणि धारदार कोयता जप्त करण्यात आला.

या प्रकरणी रावेर पोलिस स्टेशनमध्ये पोलिस कॉन्स्टेबल श्रीकांत चव्हाण यांनी सरकारतर्फे फिर्याद दाखल केली आहे. आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. फरार आरोपीचा शोध सुरू असून लवकरच त्यालाही अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.

या कारवाईदरम्यान एकूण सुमारे ३९ हजार रुपये किमतीचे अंदाजे १७५ किलो वजनाचे गोमांस तसेच धारदार सुरे जप्त करण्यात आले आहेत. जप्त केलेल्या मांसाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रंजीत पाटील यांच्या उपस्थितीत नमुने घेण्यात आले असून त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली आहे.

या प्रकरणी पुढील काळात गोवंश मांस विक्री करणाऱ्यांवर अधिक बारकाईने लक्ष ठेवून कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे रावेर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांनी सांगितले. ही कारवाई पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलिस अधीक्षक अशोक नखाते आणि पोलिस उपअधीक्षक अनिल बडगुजर (फैजपूर विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या धाडीत पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल, पोलिस उपनिरीक्षक मनोज महाजन तसेच गुन्हे शोध पथकातील प्रमोद पाटील, विशाल पाटील, श्रीकांत चव्हाण, सुकेश तडवी, गजानन बोने, राहुल परदेशी आणि शुभम काळे यांनी सहभाग घेतला. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल सिकंदर तडवी करत आहेत.


Protected Content

Play sound