चोपडा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सहा वर्षाच्या मुलीवर धारदार वस्तूने शेजारी राहणाऱ्या मुलीने वार करून जखमी केल्याची घटना चोपडा शिवारातील शिरपूर बायपास रोडवर घडली आहे. यात चिमुकली गंभीररित्या जखमी झाले असून जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, “चोपडा शिवारातील शिरपूर बायपास जवळ जानुबाई भाईदास बारेला (वय-३२) ह्या महिला पती आणि चार मुलांसह वास्तव्याला आहे. मोलमजूरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मंगळवारी, ८ फेब्रुवारी रोजी जानुबाई बारेला ह्या कामानिमित्त शेतात गेल्या होत्या तर पती भाईदास काना बारेला हे मध्यप्रदेशात कामानिमित्त गेले होते. त्यावेळी चिमुकली रितू उर्फ रिता ही घरी एकटी होती. त्यांच्या घराच्या शेजारी किरण बारेला आणि त्याची अल्पवयीन बहिण हे देखील राहतात.
दरम्यान दुपारी २ वाजेच्या सुमारास घरापासून काही अंतरावर असलेल्या ‘हॉटेल सुनिता’जवळ किरणची अल्पवयीन बहिण हिने सहा वर्षाच्या चिमुकलीवर धारदार वस्तूने तोंडावर, हातावर, पायाच्या मांडीवर आणि डोक्याच्या मागच्या भावावर वार केले. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला. दरम्यान ‘मुलीला का मारले ?’ याची माहिती मिळू शकली नाही. मुलीच्या नातेवाईकांनी तातडीने चोपडा ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. तर पुढील उपचारासाठी जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रात्री ८ वाजता दाखल करण्यात आले आहे.” याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित साळवे करीत आहे.