रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । कुसुंबा (ता. रावेर) येथे सोमवारी रात्री घडलेल्या हृदयद्रावक घटनेत एका पित्याने व्यसनाधीन आणि वारंवार वाद घालणाऱ्या ३२ वर्षीय मुलाचा लाकडी मोगरीने खून केला. मालमत्तेच्या वाटणीवरून सुरू असलेल्या वादात हा प्रकार घडला असून आरोपी पिता स्वतः रावेर पोलिसांकडे हजर झाला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
कुसुंबा येथील रविंद्र भगवान पाटील यांच्या पहिल्या पत्नीपासून सचिन आणि पूजा अशी दोन मुले असून पत्नीचे निधन झाले आहे. दुसऱ्या पत्नीपासून अभिषेक असे एक अपत्य आहे. मयत सचिन पाटील हा लहानपणापासून मामांकडे सुरत येथे राहत होता आणि अविवाहित होता. अधूनमधून तो कुसुंबा येथे वडिलांकडे येत असे. गेल्या तीन महिन्यांपासून तो गावातच राहत होता. वडिलांनी दिलेल्या ऑटोरिक्षात तो कुसुंबा–रावेर दरम्यान प्रवासी वाहतूक करत होता.

सचिन आणि रविंद्र पाटील यांच्यात मालमत्तेवरून सातत्याने वाद होत होते. सचिन हा दारूच्या नशेत त्रास देत असल्याने रविंद्र पाटील त्याला शेती वा घरातील हिस्सा देण्यास तयार नव्हते. त्यामुळे घरात सतत वादविवाद सुरू असत. सोमवारी रात्रीही सचिन दारूच्या नशेत घरी आला आणि नेहमीप्रमाणे प्रॉपर्टीबाबत बाचाबाची सुरू झाली.
वाद चिघळताच रविंद्र पाटील यांनी रागाच्या भरात सचिनला खाली पाडले, दोरीने हातपाय बांधले आणि घरातील लाकडी मोगरीने त्याच्या डोक्यावर वार केले. गंभीर जखमेमुळे सचिनचा जागीच मृत्यू झाला. रात्रीभर प्रेताजवळ बसून राहिलेल्या पित्याने सकाळी ७ वाजून ५ मिनिटांनी गावचे पोलीस पाटील रईस जाफर तडवी यांना फोन करून आपल्याकडून मुलाचा खून झाल्याची कबुली दिली.
पोलीस पाटील घटनास्थळी पोहोचले असता सचिन रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्याच्याजवळ रक्ताने माखलेली मोगरी, दारूची बाटली, ग्लास आणि स्प्राइटची बाटली पडलेली होती. पाटील यांनी तत्काळ पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांना माहिती देत आरोपीला ताब्यात ठेवले.
घटनेची माहिती मिळताच फैजपूर डीवायएसपी अनिल बडगुजर, पोलीस निरीक्षक जयस्वाल, पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील आणि ठसे तज्ञांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करून तपास सुरू केला. रविंद्र पाटील यांनी पंचासमोर मुलाचा खून केल्याची कबुली दिली असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना मालमत्ता वाद आणि व्यसनाधीनतेतून उद्भवलेल्या कौटुंबिक हिंसेचे भीषण रूप असल्याचे सामाजिक स्तरावर व्यक्त होत आहे.



