सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । “पहाटे साडेपाचची वेळ होती… एक फोन आला आणि आयुष्यातील सर्वात मोठा धक्का बसला. ज्या दादांनी आम्हाला रक्ताच्या नात्यापेक्षाही जास्त जपलं, ज्यांनी पडत्या काळात आम्हाला सावरलं, तो आमचा ‘बापमाणूस’ आज आपल्याला सोडून गेला, यावर अजूनही विश्वास बसत नाहीये.” अशा शब्दांत सावदा येथील माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक राजेश वानखेडे यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. अजितदादांच्या विमान अपघातातील निधनानंतर संपूर्ण रावेर तालुक्यासह सावदा शहरात शोककळा पसरली असून, कार्यकर्त्यांच्या मनात ‘बाप गेल्यानंतर आता पितृतुल्य दादाही गेला’ अशी पोरकी भावना निर्माण झाली आहे.

अधुरी राहिलेली ती शेवटची भेट:
निवडणुकीच्या धामधुमीत दादांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस कष्ट केले होते. जिथे पक्ष संपला असे म्हटले जात होते, तिथे दादांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसने अभूतपूर्व यश मिळवून दिले. “आम्ही दादांची मान उंचावेल असे काम केले, त्यांना अपेक्षित असणारा निकालही दिला, पण काही अडचणींमुळे त्यांना निकालानंतर भेटायला जाऊ शकलो नाही. ती शेवटची भेट आता कधीच होणार नाही आणि आमचा अखेरचा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचू शकला नाही, ही सल आयुष्यभर काळजात टोचत राहील,” असे म्हणताना वानखेडे यांचा कंठ दाटून आला.

घड्याळाच्या काट्याचा अजब योगायोग:
अजितदादा म्हणजे शिस्त आणि वेळेचे दुसरे नाव. पहाटे ६ वाजेपासून कामाला लागणारा हा लोकनेता २४/७ जनतेसाठी उपलब्ध असायचा. ज्या ‘घड्याळ’ चिन्हाला त्यांनी महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचवले, नियतीने असा काही क्रूर खेळ मांडला की, अपघातग्रस्त ठिकाणी त्यांची ओळख ही केवळ त्यांच्या हातातील ‘घड्याळा’वरूनच पटली. हा योगायोग पाहून वानखेडे यांच्यासह उपस्थित प्रत्येक कार्यकर्त्याला हुंदका आवरणे कठीण झाले होते. “ज्या घड्याळाने महाराष्ट्राला आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला, तेच घड्याळ आज त्यांच्या शेवटच्या ओळखीचे साधन ठरले, हे महाराष्ट्राचे मोठे दुर्दैव आहे,” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
सर्वसमावेशक नेतृत्व हरपले:
राजेश वानखेडे पुढे म्हणाले की, दादांनी केवळ राजकारण केले नाही, तर १८ पगड जाती, १२ बलुतेदार, अल्पसंख्याक आणि बहुजन समाजाला एकत्र बांधून ठेवण्याचे काम केले. “धीर धर, कामाला लाग” हा त्यांचा सबुरीचा सल्ला आज त्यांच्या समर्थकांना पोरका करून गेला आहे. सध्या सावदा परिसरातील सर्व नगरसेवक, पदाधिकारी आणि मित्रमंडळी एकमेकांचे सांत्वन करत असले, तरी मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी ‘ही बातमी खोटी असावी’ अशी आशा आजही वाटत आहे. एका प्रखर विचारांच्या आणि घड्याळाप्रमाणे अचूक चालणाऱ्या लोकनेत्याचा असा अंत मनाला चटका लावून जाणारा आहे.



