जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील पहूर येथे किरकोळ कारणावरून दोन जणांनी लोखंडी रॉडने मारहाण केल्याने पिता-पुत्र गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना सोमवार, २२ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता घडली असून, या प्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अरुण युवराज करनोल (वय २७, रा. पहूर पेठ, ता. जामनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहेत. सोमवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास गावात राहणारे आकाश संजय पाटील आणि चेतन संजय पाटील (दोघे रा. पहूर पेठ, ता. जामनेर) या दोघांनी अचानक अरुण करनोल आणि त्यांचे वडील युवराज करनोल यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

यावेळी कोणत्याही प्रकारच्या पूर्ववैमनस्याशिवाय दोघांनी लोखंडी रॉडने पिता-पुत्राला बेदम मारहाण केली. यात दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. मारहाण केल्यानंतर आरोपींनी त्यांना जीवे मारण्याची धमकीही दिली. या घटनेनंतर घाबरलेल्या अरुण कर्नुल यांनी पहूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. अरुण कर्नुल यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी संशयित आरोपी आकाश पाटील आणि चेतन पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रवींद्र देशमुख करत आहेत.



