अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । केवळ “माझ्याकडे का पाहिले?” या क्षुल्लक कारणावरून संतापलेल्या एका तरुणाने बाप-लेकावर सुऱ्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना अमळनेर तालुक्यातील सावखेडा येथे घडली आहे. या हल्ल्यात फिर्यादी आणि त्यांचे वडील गंभीर जखमी झाले असून, अमळनेर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १९ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास फिर्यादी विजय बापू अहिरे (वय-२३) हे आपल्या घराच्या गच्चीवर उभे होते. यावेळी आरोपी विनायक आनंदा अहिरे याने विजयने त्याच्याकडे का पाहिले, या कारणावरून वाद उकरून काढला. वादाचे रूपांतर लवकरच हाणामारीत झाले. आरोपीने विजय आणि त्यांचे वडील बापू गंगाराम अहिरे यांना आधी चापटाबुक्क्यांनी मारहाण करत अश्लील शिवीगाळ केली.

फिर्यादी विजय यांनी या मारहाणीला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, संतापलेल्या विनायकने आपल्या खिशातील लोखंडी पाते असलेली सुरी काढली. त्याने विजयच्या उजव्या हातावर आणि त्यांचे वडील बापू अहिरे यांच्याही उजव्या हातावर सुऱ्याने सपासप वार करून त्यांना रक्तबंबाळ केले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी विजय अहिरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल संदेश पाटील या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.



