शेतात पडलेल्या विजेच्या तारेचा शॉक लागल्याने पितांसह पुत्र-पुतण्याचाही मृत्यू

वाशिम-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शेतात पडलेल्या जिवंत वीज तारेने मोठा घात केला. डवरणीसाठी शेतात गेलेल्या चुलत भावांना विजेचा जोरदार धक्का बसल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मुलांच्या शोधात आलेले वडील देखील विजेच्या प्रवाहात आल्याने त्यांचा देखील दुर्दैवी अंत झाला. वाशिम जिल्ह्याच्या मंगरुळपीर तालुक्यातील पांगरी महादेव येथे शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली. वडील अशोक माणिक पवार, मुलगा मारोती अशोक पवार आणि पुतण्या दत्ता राजू पवार अशी मृतांची नावे आहेत.

वाशिम जिल्ह्याच्या मंगरुळपीर तालुक्याच्या टोकावर पांगरी महादेव हे गाव आहे. पेरणी आटोपल्याने आता शेतात डवरणी, फवारणी आदी कामे सुरू आहेत. गावातील मारोती अशोक पवार आणि दत्ता राजू पवार हे दोघे चुलतभाऊ दुसऱ्याच्या शेतात मजुरीने डवरणीच्या कामाला गेले होते. या शेत शिवारात जमिनीवर जिवंत वीज तार पडून होती. या वीज तारेकडे त्या दोघांचेही लक्ष गेले नाही. शेतात काम करीत असतांना विजेचा प्रवाह सुरू असलेल्या तारेला त्यांचा स्पर्श झाला. त्यामुळे दोघांनाही विजेचा जोरदार धक्का बसला. त्यात दोन्ही भावांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेची कुणालाही माहिती नव्हती.

मुले घरी उशिरापर्यंत परतली नसल्याने कुटुंबीय चिंतेत होते. मारोतीचे वडील अशोक पवार हे मुलांना शोधण्यासाठी त्याच शेतात गेले. काही कळायच्या आतच त्यांचा देखील जिवंत वीज तारेला स्पर्श झाला. विजेचा जोरदार धक्का असल्याने त्यांचा देखील मृत्यू ओढवला. ही घटना कळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत महावितरणला माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. या घटनेत एकाच परिवारातील तिन्ही कर्त्या पुरुषांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. पवार परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Protected Content