जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहराचे हृदय समजल्या जाणाऱ्या गोलाणी मार्केट परिसरात आज, बुधवारी ३१ डिसेंबर रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास एका १८ वर्षीय तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, परिसरातील नागरिकांनी तत्परता दाखवत आरोपीला जागीच पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

साई गणेश गोराडे (वय १८, रा. डीएनसी कॉलेजजवळ, जळगाव) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास साई हा गोलाणी मार्केट परिसरात होता. यावेळी संशयित आरोपी शुभम सोनवणे (रा. कलिंका माता मंदिर परिसर) याने जुन्या किंवा अज्ञात कारणावरून साईशी वाद घातला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि शुभमने आपल्याकडील चाकूने साईच्या छातीवर सपासप वार केले.

भरबाजारात अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. मात्र, यावेळी तेथील स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांनी घाबरून न जाता हिंमत दाखवली. त्यांनी पळून जाणाऱ्या संशयित आरोपी शुभम सोनवणे याला रंगेहात पकडले आणि तातडीने शहर पोलिसांना पाचारण करून त्यांच्या स्वाधीन केले.
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या साई गोराडे याला नागरिकांनी तातडीने एका रिक्षामध्ये टाकून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (सिव्हिल हॉस्पिटल) उपचारासाठी दाखल केले. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, या हल्ल्यामागचे नेमके कारण काय होते, याचा तपास पोलीस करत आहेत.



