फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । टोकन मागण्याच्या किरकोळ कारणावरून एकाला तीन जणांनी लाथाबुक्क्यांनी आणि लाकडी काठीने बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिगंबर गजानन चौधरी (वय ४२, रा. गांधी चौक, सावदा) हे बाजार समितीत कामाला आहेत. ५ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास, दिगंबर चौधरी हे मौजे पाडळसा येथील बाळू रुपचंद तेली यांच्या धान्य गोदामासमोर गेले होते. तेथे त्यांनी संशयित आरोपी बाळू तेली याच्याकडे बाजार समितीचे टोकन मागितले आणि “ट्रान्सपोर्टची गाडी आम्हाला न विचारता परस्पर का भरून घेता?” अशी विचारणा केली.

चौधरी यांनी विचारलेल्या प्रश्नाचा राग मनात धरून संशयित आरोपी बाळू रुपचंद तेली याने त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वादाचे स्वरूप वाढत गेल्याने बाळू तेली, ज्ञानेश्वर बाळू तेली आणि सागर रवींद्र तायडे या तिघांनी चौधरी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत नाकावर बुक्का मारल्याने त्यांचे नाक फुटून गंभीर दुखापत झाली. त्यानंतर “पुन्हा इकडे आला तर तुला पाहून घेऊ,” अशी धमकी दिली. या गंभीर मारहाणीनंतर दिगंबर चौधरी यांनी फैजपूर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. त्यानुसार पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.



