यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल-भुसावळ मार्गावरील निमगाव गावाजवळ शुक्रवारी (३ ऑगस्ट) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. पपई व्यवसायाशी संबंधित हे तीन युवक दुचाकीने यावलकडे येत असताना भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला.
मृत्यूमुखी पडलेला युवक इरफान मुश्ताक बागवान (वय ४४) असून, तो भुसावळ येथील जाममोहल्ला, बाबला हॉटेल जवळचा रहिवासी होता. या अपघातात सईद शकील बागवान (वय ४५) आणि दानिश फकीर मोहम्मद बागवान (वय २४) हे दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विशेषतः दानिश बागवान याची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.

तीघेही पपईचे व्यापारी असून एका दुचाकीवरून यावलकडे जात होते. निमगाव गावाजवळ आले असता भरधाव वेगात असलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. धडक एवढी जोरदार होती की इरफान बागवान यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर अज्ञात वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाला.
या अपघाताची माहिती मिळताच यावल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अद्याप या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला नसला तरी शून्य क्रमांकाने नोंद घेण्यात आली असून, अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. लवकरच अज्ञात वाहन आणि चालकाचा शोध घेऊन गुन्हा दाखल केला जाईल, असे पोलिस सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे व्यापारी व मुस्लीम समाजात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. इरफान बागवान हे व्यापारी वर्तुळात ओळखले जाणारे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या आकस्मिक निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे.



