Home क्राईम ट्रक आणि ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली !

ट्रक आणि ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । औद्योगिक वसाहत परिसरातील मुख्य रस्त्यावर येत असलेल्या एका ट्रकला जळगावकडे येणाऱ्या एका खाजगी ट्रॅव्हल्सने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, ट्रॅव्हल्स विरुद्ध दिशेला जाऊन थेट काँक्रीटच्या गटारीवर आदळली. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असले तरी, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, हे दिलासादायक आहे. हा अपघात रविवार, २० जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास रेमंड कंपनीच्या मागील बाजूकडील रस्त्यावर घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, औद्योगिक वसाहत परिसरातील एसएस ९ सेक्टरमधून एक मालवाहू ट्रक मुख्य रस्त्यावर येत होता. त्याचवेळी गाडेगावकडून भरधाव वेगाने येणाऱ्या एका खासगी कंपनीच्या ट्रॅव्हल्सने ट्रकच्या चालकाच्या बाजूकडील कॅबिनला जोरदार धडक दिली. ही धडक बसताच, ट्रॅव्हल्स चालकाने अचानक ब्रेक दाबल्यामुळे ट्रॅव्हल्स अनियंत्रित होऊन विरुद्ध बाजूच्या रस्त्याकडे सरकली आणि थेट काँक्रीटच्या गटारीवर आदळली.

या अपघातात ट्रॅव्हल्सच्या समोरील काचा फुटून दर्शनी भाग पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. तसेच, धडक बसलेल्या ट्रकच्या कॅबिनचेही मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर ट्रक चालकाने तात्काळ आपला ट्रक रस्त्याच्या बाजूला लावला आणि क्लिनरसह घटनास्थळावरून पळ काढला.

या रस्त्यावर सातत्याने अपघात होत असल्याने वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याची आणि वेग मर्यादेची गरज अधोरेखित झाली आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांनी चिंता व्यक्त केली असून, अशा अपघातांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.


Protected Content

Play sound