जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा परिषदेत कार्यरत अधिसंख्य शिक्षकांच्या न्यायहक्कासाठी सुरू असलेल्या संघर्षाने पुन्हा एकदा तीव्र स्वरूप घेतले आहे. जिल्हा परिषदेच्या लेखी आश्वासनानंतरही अंमलबजावणी न झाल्यामुळे शिक्षकांनी जळगाव जिल्हा परिषदेसमोर दुसऱ्यांदा आमरण उपोषण सुरू केले आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेच्या जिल्हा शाखेच्या नेतृत्वाखाली हा आंदोलनात्मक लढा उभा राहिला आहे.
शिक्षण क्षेत्रातील वरिष्ठ व निवड श्रेणींच्या अंमलबजावणीसाठी असलेल्या निकषांमध्ये जिल्हा परिषदेने अधिसंख्य शिक्षकांना वगळल्यामुळे हा वाद उफाळून आला आहे. 21 डिसेंबर 2019 च्या शासन निर्णयानुसार अधिसंख्य पदावर वर्ग केलेल्या शिक्षकांना निवड श्रेणी मिळावी, यासाठी शिक्षकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. प्रशासनाने 2019 च्या आधी पात्र ठरलेल्या शिक्षकांना निवड श्रेणीस अपात्र ठरवण्याचा निर्णय घेतल्याने असंतोष वाढला आहे.
10 ऑक्टोबर 2024 रोजी प्रथमच उपोषणाला बसलेल्या शिक्षकांनी लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेतले होते. त्यानुसार, अधिसंख्य पदावर वर्ग करण्यापूर्वी पात्र असलेल्या शिक्षकांना निवड श्रेणी मंजूर केली जाईल, असे ठोस आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकाऱ्यांकडून देण्यात आले होते. मात्र, दोन महिने उलटूनही कोणतीही अंमलबजावणी न झाल्याने शिक्षकांमध्ये नाराजी पसरली.
प्रशासनाचा दुटप्पीपणा
जिल्हा परिषद प्रशासनाच्या अपुऱ्या धोरणांमुळे अधिसंख्य शिक्षकांना न्याय मिळत नसल्याचा आरोप केला जात आहे. विशेष मागास प्रवर्गात येणाऱ्या शिक्षकांच्या बाबतीत 1995 पासूनचे शासन निर्णय आणि त्यांच्या अटींचा दाखला देऊन शिक्षक संघटनांनी आपल्या मागण्यांची वैधता पटवून दिली आहे. शासन निर्णयांनुसार निवड श्रेणी मंजुरी हा पदोन्नतीचा एक भाग आहे. त्यामुळे अधिसंख्य शिक्षकांना पात्रतेनुसार श्रेणी दिली जावी, अशी मागणी आहे. तथापि, जिल्हा परिषदेने न्यायालयाच्या आदेशांचाही विचार न करता शिक्षकांना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवले आहे.
उपोषणकर्त्यांमध्ये काही शिक्षक गंभीर आजारांनी ग्रस्त असून, त्यांचे वयही अधिक आहे. त्यामुळे प्रशासनाचा विलंब त्यांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम करू शकतो. “आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण थांबणार नाही,” असे आंदोलनकर्त्यांनी ठामपणे सांगितले आहे. जळगाव जिल्हा परिषदेसमोर सुरू असलेल्या शिक्षकांच्या न्यायहक्कांसाठीच्या आमरण उपोषणाला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष राजेंद्र सपकाळे, जिल्हा सचिव जगन्नाथ कोळी, तसेच अन्यायग्रस्त शिक्षक गटाचा पाठिंबा आहे. उपोषणकर्त्यांमध्ये गंगाधर सपकाळे, सुनिता बिरहारी, सुनंदा सैंदाणे, रनिता ठाकरे, सुनिता लोहारे, गोपिचंद बाविस्कर, विकास सैंदाणे, प्रकाश शिरसाठ, बन्सिलाल शिरसाठ, चंद्रकांत सूर्यवंशी, युवराज तायडे यांचा समावेश आहे..