Home Cities अमळनेर चार ठिकाणी लागलेल्या आगीत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान

चार ठिकाणी लागलेल्या आगीत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान


अमळनेर लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी : जळगाव तालुक्यातील चार वेगवेगळ्या गावांमध्ये लागलेल्या आगींमुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. यातील दोन ठिकाणी विद्युत तारांच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे स्पष्ट झाले असून, या प्रकारांमुळे वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणावर सवाल उपस्थित होत आहेत.

तालुक्यातील तरवाडे शिवारात महेंद्र शिवराम पाटील यांच्या शेतात १९ एप्रिल रोजी दुपारी १.३० वाजता शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. त्यांनी काढून ठेवलेल्या मक्याचा चारा आणि ठिबक सिंचनाचे साहित्य या आगीत जळून खाक झाले. आग इतकी मोठी होती की गावकऱ्यांच्या मदतीनेही ती नियंत्रणात आली नाही. शेवटी अमळनेर नगरपरिषदेचा अग्निशमन बंब बोलावावा लागला. या आगीत अंदाजे १ लाख ७० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

दुसरी घटना २० एप्रिल रोजी ढेकू खुर्द येथे घडली. येथेही विजेच्या तारांच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागून नथु गुणवंतराव पाटील यांचा १ लाख ३५ हजारांचा मका आणि ठिबक साहित्य जळून गेले. शेजारील सुधाकर नाटू पाटील यांच्या २ लाख ३० हजार रुपयांचे शेतमाल व साहित्यही आगीत भस्मसात झाले. वाऱ्यामुळे आग झपाट्याने पसरली आणि गावकऱ्यांनी टँकरच्या सहाय्याने ती विझवली.

त्याचदिवशी डांगरी येथे दुपारी दोन वाजता खळवाडीत आग लागून झाडे झुडपे जळाली. तर मांडळ येथे मोहाडी रस्त्यालगत लागलेल्या आगीतही झाडांनाच नुकसान झाले. या दोन्ही ठिकाणी अग्निशमन दलाने वेळीच पोहोचून आग आटोक्यात आणली.

या सर्व आगी विझवण्यासाठी मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्या आदेशानुसार अग्निशमन दल प्रमुख गणेश गोसावी, दिनेश बिऱ्हाडे, आकाश बाविस्कर, फारुख शेख आणि लखन कंखरे यांनी तत्परता दाखवली. गेल्या काही दिवसांमध्ये अमळनेर तालुक्यात १५ ते १६ ठिकाणी आगी लागल्याने हा तालुका “आगीचा तालुका” म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. या आगीत शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले असून, वीज वितरण कंपनीने भरपाई द्यावी, अशी जोरदार मागणी होत आहे.


Protected Content

Play sound