
यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । केंद्र शासनाच्या वतीने उभारण्यात येणारा रोगमुक्त केळी रोपे देणारा टिशुकल्चर लॅब प्रकल्प यावल येथेच सुरू करण्यात यावा, अशी मागणी यावल महसूल मंडळ केळी उत्पादक संघर्ष समितीने केंद्रीय मंत्री ना. रक्षाताई खडसे, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील आणि आ. अमोल जावळे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

केळी उत्पादक संघर्ष समितीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, जळगाव जिल्ह्यातील यावल, रावेर, चोपडा आणि भुसावळ ही केळी उत्पादनाची प्रमुख क्षेत्रे आहेत. येथील केळी उत्पादक शेतकऱ्यांना अधिक उत्पादन मिळवण्यासाठी कमी किमतीत रोगमुक्त आणि दर्जेदार टिशुकल्चर रोपे उपलब्ध होणे आवश्यक आहे. या उद्देशाने केंद्र शासनामार्फत विशेष टिशुकल्चर प्रकल्प उभारणीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
समितीने पुढे असेही नमूद केले आहे की, केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने यावल हे रावेर, भुसावळ, चोपडा या क्षेत्रातील शेतकरी बांधवांसाठी मध्यवर्ती ठिकाण आहे. केळीचे निर्यातक्षम उत्पादन करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाची जोड असणे गरजेचे आहे. यावल येथे कृषी विभागाची सुमारे २५ हेक्टर जागा मुबलक पाण्यासह उपलब्ध आहे. त्यामुळे यावल येथे नवीन टिशुकल्चर लॅबची उभारणी झाल्यास तालुक्यातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि केळी उत्पादक शेतकऱ्यांना रोगमुक्त व दर्जेदार केळी उत्पादन करण्याची संधी मिळेल.
यावल परिसरातील शेतकरी आणि यावल महसूल मंडळ केळी उत्पादक संघर्ष समितीने केंद्र शासनाच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या टिशुकल्चर लॅब रोपे प्रकल्पाची उभारणी यावल येथेच करावी, अशी विनंती शासनाकडे केली आहे.



