Home प्रशासन जिल्हाधिकारी कार्यालय रेल्वे लाईनसाठी जमिनी संपादनास शेतकऱ्यांचा तीव्र विरोध ; फैजपूरमध्ये निवेदन 

रेल्वे लाईनसाठी जमिनी संपादनास शेतकऱ्यांचा तीव्र विरोध ; फैजपूरमध्ये निवेदन 


सावदा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भुसावळ ते खंडवा दरम्यान प्रस्तावित तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे लाईनसाठी रावेर तालुक्यातील गहुखेडे व रणगाव या गावांमध्ये होणाऱ्या जमिनी संपादनाच्या प्रक्रियेला स्थानिक शेतकऱ्यांकडून तीव्र विरोध होत आहे. भारत सरकारच्या अधिसूचनेनंतर शेतकऱ्यांनी फैजपूर उपविभागीय अधिकाऱ्यांना एकत्र येऊन निवेदन दिले असून, भविष्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

७ जुलै २०२५ रोजी भारत सरकारच्या राजपत्रात रेल्वे सुधारित अधिनियम २००८ अंतर्गत कलम २०-ए नुसार या संपादनाची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार गहुखेडे व रणगाव येथील एकूण ७० गटांतील सुमारे २१ हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. या निर्णयाविरोधात बाधित शेतकरी एकवटले असून त्यांनी आज फैजपूर येथे उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकाऱ्यांना लेखी निवेदन सादर केले. या निवेदनात त्यांनी आपली आक्रमक भूमिका मांडली आहे.

शेतकऱ्यांनी अधोरेखित केले की, प्रस्तावित रेल्वे लाईन ही बारमाही बागायती जमिनीवरून जाणार आहे, जी केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध असून विदेशात निर्यातही होते. ही जमीनच त्यांची मुख्य उपजीविकेची साधनं असल्यामुळे ती गेल्यास संपूर्ण कुटुंब उपासमारीच्या उंबरठ्यावर येईल, असा इशारा त्यांनी दिला.

रेल्वे लाईनमुळे त्यांच्या एकसंध शेतीचे दोन तुकडे होणार असून, त्यामुळे शेतीची कार्यक्षमता कमी होईल व दुसऱ्या बाजूची जमीन अविकसित राहील, असे मत व्यक्त करण्यात आले. याशिवाय, नियमित भूआकारात होणारा बिघाड जमिनीच्या शेतीयोग्यतेवर परिणाम करेल व उरलेली जमीन उपयोगी ठरणार नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

गावशिवारातील विकास प्रक्रियेलाही या प्रस्तावामुळे मोठा अडथळा येणार असून, रेल्वे लाईन गावाचा नकाशा आणि सामाजिक-सांस्कृतिक एकात्मता भंग करेल, अशी चिंता नागरिकांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांनी ही अधिसूचना रद्द करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा निर्वाणीचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.

प्रशासन या विरोधाची दखल घेते की नाही, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. शेतकऱ्यांची एकजूट आणि त्यांच्या मागण्यांचे गांभीर्य लक्षात घेता, हे प्रकरण लवकरच मोठे स्वरूप धारण करू शकते.


Protected Content

Play sound