ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीकडे वळावे – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर केल्याने शेतकऱ्यांना मजूर टंचाईच्या समस्येवर तोडगा काढता येईल, असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री आणि जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. पिंपळे खुर्द येथे आत्मा (ATMA) अंतर्गत जिल्हांतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.

शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घ्यावा:
यावेळी बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे शेतकऱ्यांना उत्पादनवाढीसह शेतीतील विविध अडचणींवर मात करता येऊ शकते. यासाठी शेतकऱ्यांनी आत्मा अंतर्गत शेतकरी गट स्थापन करून ड्रोनच्या मदतीने फवारणी तंत्रज्ञानाचा लाभ घ्यावा आणि अनुदानासाठी अर्ज करावा.

ग्रामीण भागाच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही:
या कार्यक्रमात मंत्री गुलाबराव पाटील यांचा ग्रामस्थांनी व ग्रामपंचायतीमार्फत शाल, श्रीफळ व गुलाबाचा हार घालून भव्य नागरी सत्कार केला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, गावाचे प्रेम व सत्कार सदैव स्मरणात राहील व गावासाठी निधीची निकड भासू देणार नाही.

शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमात विविध विषयांवर मार्गदर्शन:
शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमात आत्मा प्रकल्प संचालक कुरबान तडवी यांनी ॲग्री स्टेक शेतकरी नोंदणीबाबत मार्गदर्शन केले. रब्बी हंगामातील पिकांवरील कीड व रोग संरक्षणाविषयी डॉ. हेमंत बाहेती यांनी माहिती दिली. शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या विविध कृषी यंत्रांची देखभाल आणि दुरुस्ती कशी करावी, यासंदर्भात वैभव सुर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले. तसेच ड्रोन तंत्रज्ञानाद्वारे फवारणीचे महत्त्व आणि त्याचा उपयोग याविषयी यश वाघ यांनी सखोल माहिती दिली.

कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन:
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आत्मा बीटीएम दीपक नागपुरे यांनी केले. त्यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. तालुका कृषी अधिकारी किरण देसले यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कृषी सहाय्यक विमल सुरावार, गजानन मोरे, राहुल पवार, पद्माकर पाटील, तृषिकेश रेड्डी, अक्षय पाटील, नितीन पाटील, ललित पाटील, रविंद्र पाटील यांनी मेहनत घेतली.

Protected Content