रावेर/सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथे आमरण उपोषणासाठी बसलेल्या शेतकऱ्यांना तब्बल २२ कोटी रूपयांची विम्याची रक्कम मिळणार असल्याचे लेखी आश्वासन तहसीलदारांनी दिल्यानंतर येथे शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाची सांगता केली. भाजप नेते नंदकिशोर महाजन यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांनी उपोषण सोडले.
या संदर्भातील वृत्त असे की, थकीत असलेली पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळावी यासाठी गहूखेडा येथील राजेश कैलास चौधरी तसेच परिसरातील शेतकऱ्यांनी सोमवार सकाळपासून तहसील कार्यालयाच्या समोर आमरण उपोषण सुरू केले होते. या उपोषणाची दखल घेत भाजप नेते नंदकिशोर महाजन यांनी जलसंपदा मंत्री ना. गिरीशभाऊ महाजन यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी उपोषणकर्त्या शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम लवकरच वर्ग करण्यात येणार असल्याची ग्वाही दिली. यानंतर रावेरच्या तहसीलदारांनी राजेश कैलास चौधरी यांना लेखी आश्वासन दिले.

यात पुनर्रचीत हवामान आधारीत फळपीक विमा योजनेच्या अंतर्गत अंबिया बहार सन 2024/25 मधील पिक विम्याची एकूण थकीत रक्कम ही 28 कोटी 70 लक्ष रूपये आहे. यातील सुमारे 22 कोटी 46 लाख रूपयांची रक्कम अदा करण्यासाठी भारतीय कृषी विमा कंपनीस उपलब्ध करण्यात आली असून ती कंपनीच्या वतीने पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, तहसीलदारांचे पत्र प्राप्त होताच गहूखेडा येथील राजेश चौधरी, रुपेश पाटील रायपूर आणि दिपेश पाटील रणगाव या उपोषण करणाऱ्या शेतकऱ्यांनी नंदकिशोर महाजन यांच्या उपस्थितीत आपले उपोषण समाप्त केले. याप्रसंगी रमेश पाटील यांच्यासह सावदा मंडळातील हेमराज पाटील रायपूर, मधुकर पाटील, वसत चौधरी, राकेश पाटील, मुकेश पाटील, सचिन पाटील, गजानन चौधरी, मयूर पाटील, मोहन प्रवीण पाटील, भैया पाटील, जे. के. पाटील, रोहिदास पाटील, राहुल पंकज पाटील, डॉ. निलेश पाटील रणगाव, गजानन पाटील, संदीप कोळी, नितीन कोळी, कल्पेश चौधरी, नितीन पाटील तसखेडा, प्रदीप पाटील, लीलाधर पाटील, संदीप पाटील हिरामण चौधरी, तेजस चौधरी उदळी, सुधीर पाटील, भूषण पाटील, जयवंत राजपूत, सचिन चौधरी तांदलवादी. शशांक पाटील रायपूर. गोपाळ पाटील. प्रदीप पाटील. संदीप पाटील. गणेश कोळी. स्वप्नील पाटील आदींची उपस्थिती होती.



