नागपूर प्रतिनिधी । हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठी घोषणा केली आहे. गोर-गरिबांना 10 रुपयात शिवभोजन मिळणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले असताच 2 लाख रुपयांपर्यंतचे शेतकऱ्यांचे कर्जमाफ करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत केली.
महविकास आघाडी सरकार राज्यात सत्तारुढ झाल्यानंतर शेतकरी कर्जमाफी घोषणेची प्रतिक्षा राज्यातील शेतकऱ्यांना होती. आज विधीमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी ‘महात्मा फुले कर्जमाफी’ योजनेतंर्गत कर्जमाफीची घोषणा केली. शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा होणार आहे. शेतकऱ्यांची ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतची कर्जे माफ होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. मार्च महिन्यांपासून कर्जमाफीची प्रक्रिया सुरू होणार आहे. दोन महिने प्रशासकीय कामांसाठी लागणार असल्यामुळे मार्च महिन्यांपासून ही कर्जमाफी योजना सुरू होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. नियमितपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सरकार दिलासा देणार असून त्यांच्यासाठीच्या योजनेची घोषणा लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.