पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारोळा तालुका शेतकी सहकारी संघाच्या मनमानी कारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आज तहसील कार्यालयावर धडक दिली. तहसीलदार डॉ. उल्हास देवरे यांना निवेदन देत, शेतकरी बांधवांना भेडसावणाऱ्या ज्वारी खरेदीच्या समस्येकडे लक्ष वेधण्यात आले.

महाराष्ट्र शासनाच्या भरड धान्य खरेदी योजनेअंतर्गत पारोळा तालुक्यातील सुमारे १५०० शेतकऱ्यांनी ज्वारी खरेदीसाठी नावनोंदणी केली आहे. मात्र, यापैकी केवळ ५९४ शेतकऱ्यांचीच ज्वारीची मोजणी व खरेदी करण्यात आली आहे. अद्याप ९०६ शेतकऱ्यांची ज्वारी खरेदी प्रलंबित असून, यासंदर्भात शेतकरी सहकारी संघात विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.

यामुळे शेतकऱ्यांकडे पडून असलेल्या ज्वारीची प्रत दिवसेंदिवस खराब होत असून, वजनातही घट येत आहे. यामुळे तालुक्यातील शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. ही बाब लक्षात घेऊन, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) पारोळा तालुक्याच्या वतीने तहसीलदार डॉ. देवरे यांना निवेदन सादर करण्यात आले.
या निवेदनात, उर्वरित शेतकऱ्यांचा ज्वारीचा माल लवकरात लवकर मोजण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. जर ही मागणी पूर्ण झाली नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तालुक्यात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल आणि यास पूर्णपणे शासन जबाबदार असेल, असा इशाराही देण्यात आला आहे.
युवा नेते तथा तामसवाडी देवगटाचे लोकप्रिय जिल्हा परिषद सदस्य रोहन सतीशराव पाटील यांच्या नेतृत्वात हे निवेदन देण्यात आले. यावेळी विधानसभा क्षेत्र प्रमुख डॉ. शांताराम पाटील, तालुकाध्यक्ष संतोष महाजन सर, जिल्हा परिषद सदस्य हिंमत वामन पाटील, युवक जिल्हा उपाध्यक्ष अंकुश भागवत, ललित सोनवणे, पारोळा शहर युवक अध्यक्ष विशाल बडगुजर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



