भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भुसावळ तालुक्यातील शेतकरी आणि पशुपालक वर्ग शासकीय योजनांपासून वंचित असल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी लाईव्ह ट्रेंड्स न्यूजच्या माध्यमातून प्रसारित करण्यात आले होते. परंतु आज पर्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सदर प्रकरणाची कुठली दखल घेतली गेली नाही. शासकीय योजनांचा लाभ मिळणे कामी पंचायत समिती भुसावळ येथे कार्यरत संबंधित अधिकाऱ्याकडून (ए.पी.ओ) वैयक्तिक आर्थिक स्वार्थासाठी पैशांची मागणी केली जाते आणि ती जर पूर्ण न केल्यास सदर लाभार्थ्यास त्या योजनेच्या लाभपासून वंचित रहावे लागते. सदर अधिकाऱ्याकडून पैशांची मागणी ही वरिष्ठांच्या सांगण्यावरून करण्यात येत असल्याचे लाभार्थ्यांना सांगण्यात येते.
संबंधित अधिकारी (ए.पी.ओ) भुसावळ पंचायत समिती येथे मागील पाच वर्षापासून कार्यरत असून ते स्वतः हुकूमशाही राबवित असल्याचे आढळून येते. सदर अधिकाऱ्याच्या बाबतीत भुसावळ पंचायत समितीचे ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे शेतकऱ्यांनी आणि पशुपालकांनी वेळोवेळी तोंडी आणि लेखी स्वरूपात तक्रारी दाखल केलेल्या आहे. तसेच सदरच्या तक्रारीबाबतचे पत्र मा. जिल्हाधिकारी साहेब यांना सुद्धा दिलेले आहे. तरीसुद्धा सदर अधिकाऱ्यावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही प्रशासनाकडून आणि वरिष्ठांकडून आज पावेतो झालेली नाही.सदर अधिकाऱ्यांकडून तालुक्यातील शेतकऱ्यांची आणि पशुपालकांची शासकीय योजनेचा लाभ मिळणेकामीचे प्रकरणे व्यैयक्तिक आर्थिक लाभासाठी मागील एक ते दोन वर्षांपासून प्रलंबित ठेवण्यात आलेले आहेत.
संबंधित अधिकाऱ्याच्या अधिपत्याखाली राबवण्यात येणाऱ्या सर्व शासकीय योजनांची माहिती जर माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत मागितली गेली तर प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची माहिती दिली जात नाही आणि त्यांच्याकडून माहिती देण्याकरता वेगवेगळी कारणे दाखवून टाळाटाळ केली जाते.यातून असे स्पष्ट होते की सदर अधिकाऱ्यावर वरिष्ठांचा वरदस्त असून सदर अधिकाऱ्याकडून होणाऱ्या आर्थिक वाटाघाटी मध्ये सुद्धा वरिष्ठांचा वाटा असल्याचे निदर्शनास येते. संबंधित अधिकाऱ्याने शासकीय योजनांच्या आधारे वरकमाई करून खूप माया जमा केली असल्याची चर्चा पंचायत समितीमध्ये होत असते. संबंधित अधिकाऱ्याबाबत एवढ्या मोठ्या तक्रारी असून सुद्धा प्रशासन आणि वरिष्ठ अधिकारी यावर कुठली कार्यवाही करत नसल्यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
बोदवड पंचायत समितीमधील घरकुल घोटाळ्याचे प्रकरण ताजे असतांनाच भुसावळ पंचायत समितीमधील हा घोटाळा ही लवकरात लवकर उघड होईलच.वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्याच्या अधिपत्याखाली आजपावेतो सुरू असलेल्या सर्व योजनांची चौकशी करून सर्व दोषींवर कठोर कार्यवाही करावी अशी चर्चा सर्वत्र पशुपालक आणि शेतकरी वर्गामध्ये सुरू असून याबाबत आंदोलन करण्याचीही तयारी सुरू असून जन आक्रोश निर्माण होत आहे.