पारोळा (प्रतिनिधी) । शासनाच्या निर्णयानुसार शेतकऱ्यांना अद्यापर्यंत बोंडअळीची नुकसान भरपाई दिली नाही ती त्वरीत शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यात वर्ग करावी यासाठी आज जळगाव जिल्हा जागृत मंच आणि राजीव गांधी पंचायत राज संघटनेच्या वतीने तालुक्यातील उंदीरखेडे येथील गावात ग्रामपंचायत चावडीवर सायंकाळी ५-३० पासून आमरण उपोषणास सुरूवात करण्यात आली. यावेळी या उपोषणात राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रविण पाटील, जिल्हा सचिव शिवराम पाटील, अध्यक्ष उमेश पाटील यांच्यासह पारोळा तालुक्यातील शेतकरींनी उपोषणात सहभाग नोंदविला.
शेतकऱ्यांच्या नेमक्या काय आहेत मागण्या
१) २३-२-१७ रोजी जी आर निघाला.शेतकऱ्यांना अद्याप बोंडअळीची नुकसानभरपाई दिली नाही.पुर्ण एक वर्षे कोणतेही सबळ कारण नसतांना शेतकऱ्यांची अडवणूक केलेली आहे.यामागील उद्देश जाहीर करावा.
२) आम्ही पत्रव्यवहार केला.३०-१-१९ पासून आंदोलनाची नोटीस दिली.तेंव्हा आपण प्रत्युत्तर दिले कि ११-३-१९ला कलेक्टर कडून बोंडअळीची नुकसानभरपाई ची रक्कम मंजूर झालेली आहे.मग वितरीत करण्यास काय अडचण आहे?
३) निवडणुकीची आचारसंहिता असली तरी सरकारकडून शेतकऱ्यांना दिली जाणारी नुकसानभरपाई देण्यास मनाई नाही. तसे आपणास आदेश असतील तर लेखी स्वरूपात द्यावे.
४) बोण्डअळीची नुकसानभरपाई देण्याचा शासन निर्णय हा आचारसंहिता जारी होण्याच्या एक वर्ष आधीचा असल्याने हे अनुदान वितरीत करण्यासाठी अथवा या अनुदान वितरणाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी पक्षविरहित सनदशीर आंदोलन करण्यासाठी निवडणूक आचारसंहिता अजिबात आडवी येत नाही.आपण आचारसंहितेचे बुजगावणे वापरून शेतकऱ्यांना खोटी भीती दाखवत आहात.हक्कांची पायमल्ली करीत आहात.
५) आपण सरकारच्या आदेशाचे उल्लंघन करून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करीत आहात.शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी करून आत्महत्या करण्यास आपण जबाबदार असल्याचे दिसते.
६) आपण शेतकऱ्यांना बोंडअळीची नुकसानभरपाई न दिल्याकारणे उपोषण करावे लागत आहे. आपण याआधीच वेळेवर नुकसानभरपाई दिली असती तर शेतकऱ्यांना आंदोलन करण्याची आवश्यकता नव्हती.या आंदोलनास सर्वस्वी तलाठी व तहसीलदार जबाबदार आहेत.आम्ही शेतकरी मुळीच नाहीत.
७) शेतकऱ्यांना मिळणारी नुकसानभरपाई अडवणे किंवा प्रलंबित करणे कोणत्याही कारणे समर्थनिय नाही.यातून तहसील कार्यालयाची कामचोरी ठळकपणे लक्षात येत आहे. शेतकऱ्यांचे आंदोलन रद्द करण्यासाठी नुकसानभरपाई ची रक्कम ताबडतोब वितरीत करावी. आपण नुकसानभरपाई देण्यास असमर्थ असल्यास हा प्रश्न मा.महसूलमंत्री ना चंद्रकांत दादा पाटील यांचे स्तरावरून सोडवण्यात येईल.
८) बोंडअळीची नुकसानभरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणे आपणास बंधनकारक आहे.आधिकाराचा गैरवापर करून अडवणुक करीत असाल तर आम्ही शेतकरी, या निवडणुकीत सहभाग घेणार नाहीत.