मुंबई (वृत्तसंस्था) बँकेच्या कर्जामुळे हैराण झालेल्या एका शेतकऱ्याने त्याच्या लहान मुलीसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ‘मातोश्री’ निवासस्थानात घुसण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी हा शेतकरी आला होता. मात्र पोलिसांनी त्याला अडवून त्याला पोलीस ठाण्यात नेले आहे.
देशमुख नावाचे शेतकरी आपल्या समस्या घेऊन पनवेलहून मुंबईत आले होते. त्यांच्यावर कर्जाचा डोंगर असून बँक त्यांची अडवणूक करत असल्याचे त्यांनी सांगितले. मी सर्व कागदपत्रांची पूर्तता केली आहे, तरीसुद्धी बँक अडवणूक करत असल्याचा त्यांनी आरोप केला आहे. याच संदर्भात एक फाईल घेऊन देशमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी मातोश्री बाहेर आले होते. त्यांच्यासोबत आठ वर्षांची मुलगीही होती. मात्र, दोनतीन तासांनंतरही त्यांना मुख्यमंत्र्यांना भेटता आले नाही. त्यामुळे त्यांनी मातोश्रीच्या आत जाऊ देण्याची विनंती पोलीसांना केली. ही विनंती नाकारत पोलीसांनी त्यांना ताब्यात घेण्याच प्रयत्न केला. दरम्यान, कोणत्याही पूर्व परवानगीशिवाय मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी शेकडो लोक रोज मातोश्रीवर येत असतात. त्यामुळे या लोकांशी असे वागावेच लागते, अशी सारवासारव पोलिसांनी केली आहे.