Home धर्म-समाज शेतकऱ्यांचे हाल! ई-केवायसी पूर्ण न झाल्याने ३५५ कोटी रुपयांची रक्कम तिजोरीत पडून

शेतकऱ्यांचे हाल! ई-केवायसी पूर्ण न झाल्याने ३५५ कोटी रुपयांची रक्कम तिजोरीत पडून

0
124

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने जाहीर केलेले ३१ हजार ६२८ कोटी रुपयांचे मदत पॅकेज मोठे आशादायक ठरले होते. मात्र, हा निधी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होताना गंभीर तांत्रिक त्रुटी समोर आल्या आहेत. ई-केवायसी पूर्ण नसणे, बँक व आधार माहितीतील मोठी तफावत आणि पोर्टलवरील तांत्रिक अडचणींमुळे तब्बल ५ लाख ४२ हजार १४१ शेतकऱ्यांना अजूनही घोषित मदत मिळालेली नाही.

या शेतकऱ्यांच्या नावावरची एकूण ३५५ कोटी ५५ लाख रुपयांची रक्कम शासनाच्या तिजोरीतच पडून असल्याची धक्कादायक माहिती मुख्य सचिवांनी घेतलेल्या आढावा बैठकीतून उजेडात आली आहे.

अडकलेल्या निधीचा सर्वाधिक भार मराठवाडा विभागातील शेतकऱ्यांवर पडला आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातील ७ जिल्ह्यांमध्ये एकट्या १६५ कोटी ७२ लाख रुपयांची मदत प्रलंबित आहे. नांदेड (३१.५६ कोटी), छत्रपती संभाजीनगर (२८.५१ कोटी) आणि परभणी (२२.५७ कोटी) या जिल्ह्यांतील हजारो शेतकरी आजही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.

केवळ मराठवाडाच नव्हे, तर राज्याच्या इतर विभागांतही मोठी रक्कम प्रलंबित आहे. नाशिक विभागात ५० कोटी २१ लाख, अमरावती विभागात ८३ कोटी ९ लाख, नागपूरमध्ये ३३ कोटी १ लाख, पुणे विभागात २० कोटी २९ लाख, तर कोकण विभागात ३ कोटी २७ लाख रुपयांचा निधी अडकला आहे. ई-केवायसी पूर्ण न झाल्यामुळे सर्वाधिक रक्कम अडकल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. तांत्रिक त्रुटी तातडीने दूर करून हा प्रलंबित निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा कधी होणार, हाच महत्त्वाचा प्रश्न सध्या उभा राहिला आहे.


Protected Content

Play sound