चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील बोढरे शिवारातील सोलार कंपनीने कवडीमोल भावाने शेतकऱ्यांकडून जमिनी खरेदी केल्या असून याप्रकरणी योग्य न्याय मिळावा, या हक्कासाठी मुंबईत शेतकऱ्यांतर्फे आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान, आज दुसरा दिवस असून उभ्या पावसातही आंदोलन सुरुच आहे.
तालुक्यातील बोढरे-शिवापूर शिवारातील सोलर फार्मस प्रा. लि. व जेबीएम सोलर म. प्रा. लि या बेकायदा सोलर कंपनीने कवडीमोल भावाने शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी केल्या आहेत. गेल्या चार वर्षांपासून पिडीत शेतकऱ्यांकडून लढा सुरूच ठेवला आहे. मात्र महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर असल्याने आतातरी निर्णय शेतकऱ्यांच्या बाजूने लागून त्यांच्या हक्काचा मोबदला मिळवून देतील मोजक्या शेतकऱ्यांसह शेतकरी बचाव कृती समितीकडून मुंबई येथील आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन २१ सप्टेंबर पासून सुरू आहेत. दरम्यान उभ्या पावसात हे आंदोलन सुरू आहे. त्यामुळे सरकारचे लक्ष या आंदोलन कर्त्यांकडे जावून त्यांची समस्या मार्गी लावतील का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. तत्पूर्वी महसूलमंत्री यांचे सचिवांकडून चर्चा करण्यासाठी बोलावणे झाले. मात्र चर्चा नको एसआयटी चौकशी लावावी अशा मागणीचे पवित्रा शेतकरी बचाव कृती समितीने घेतले आहेत. मात्र गरज पडल्यास मुख्यमंत्री, महसूल मंत्री, उर्जामंत्री किंवा पर्यावरण मंत्र्यांसोबत चर्चा करण्याची तयारी शेतकरी बचाव कृती समितीने दर्शविले असल्याची माहिती लाईव्ह ट्रेंड्स न्युजशी बोलताना पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.