नवी दिल्ली वृत्तसंस्था | तब्बल ३७८ दिवसानंतर संयुक्त किसान मोर्चाने शेतकरी आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली आहे. ११ डिसेंबरपर्यंत शेतकरी दिल्लीची सीमा सोडून जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
गुरुवारी सकाळी सरकारचे अधिकृत पत्र प्राप्त झाल्यानंतर आज दुपारी शेतकर्यांची बैठक झाली, त्यानंतर शेतकरी आंदोलन संपवण्याची घोषणा करण्यात आली. १० डिसेंबर रोजी हेलिकॉप्टर अपघातात शहीद झालेल्या सैनिक आणि सीडीएस बिपिन रावत यांच्या अंत्यसंस्कारामुळे शेतकरी जल्लोष साजरा करणार नाहीत आणि शोकसभा घेतील. त्यानंतर ११ डिसेंबरला दिल्ली सीमेवर जल्लोष होईल आणि त्याच दिवशी शेतकरी आपापल्या घराकडे परत जातील.
आंदोलन संपल्यानंतर शेतकरी नेते राकेश टिकैत हे प्रसारमाध्यमांशी बोलतांना म्हणाले की, काल हेलिकॉप्टर अपघातात शहीद झालेल्या जवानांच्या स्मरणार्थ आम्ही सीमेवर राहू आणि देशासोबत शोक व्यक्त करू. यानंतर ११ डिसेंबरपासून परतीचा प्रवास होईल. शहीद शेतकर्यांच्या कुटुंबीयांना भेटायलाही आम्ही जाणार आहोत. आम्ही आंदोलन मागे घेतले असले तरी, मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा आंदोलन सुरू केले जाऊ शकते.
दरम्यान, आंदोलनाचे नेतृत्व करणार्या पंजाबमधील ३२ शेतकरी संघटनांनी आपले कार्यक्रम जाहीर केले आहेत. ११ डिसेंबरला दिल्ली ते पंजाब असा फतेह मार्च निघणार आहे. सिंघू आणि टिकरी सीमेवरून शेतकरी एकत्र पंजाबला रवाना होतील. १३ डिसेंबर रोजी पंजाबमधील ३२ संघटनांचे नेते अमृतसर येथील श्री दरबार साहिब येथे नतमस्तक होणार आहेत. त्यानंतर १५ डिसेंबरला पंजाबमध्ये सुमारे ११६ ठिकाणी निघालेले मोर्चे संपुष्टात येणार आहेत. हरियाणातील २८ शेतकरी संघटनांनीही वेगळी रणनीती आखली आहे.