Home पर्यावरण केळी पीकविमा रक्कम न मिळाल्याने शेतकरी आक्रमक; रावेर येथे आमरण उपोषणाची घोषणा

केळी पीकविमा रक्कम न मिळाल्याने शेतकरी आक्रमक; रावेर येथे आमरण उपोषणाची घोषणा

0
140

सावदा ता रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना अद्याप पीकविमा रक्कम मिळाली नसल्याने संतापाची लाट उसळली असून या प्रश्नावर आता शेतकरी आक्रमक झाले आहेत. शासनाने जाहीर केलेली विमा रक्कम तात्काळ खात्यात जमा करावी या प्रमुख मागणीसाठी येत्या २३ फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनामुळे प्रशासनाचे लक्ष पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांकडे वेधले गेले आहे.

सावदा परिसरासह रावेर तालुका हा केळी उत्पादनासाठी राज्यभर ओळखला जातो आणि येथील हजारो शेतकऱ्यांचे अर्थकारण पूर्णपणे या नगदी पिकावर अवलंबून आहे. मात्र अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि नैसर्गिक आपत्तीमुळे केळी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. शासनाने पीकविमा जाहीर केला असला तरी प्रत्यक्षात अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याची रक्कम जमा झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली असून आर्थिक संकट अधिक गडद झाले आहे.

पीकविमा रक्कम न मिळाल्याने शेतकऱ्यांना बँकांचे कर्ज हप्ते, शेतीसाठीचा खर्च आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. आधीच नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना विमा रक्कम हा मोठा आधार ठरणार होता, मात्र तीच रक्कम रखडल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे शासन आणि प्रशासनाविरोधात नाराजीचा सूर अधिक तीव्र होत आहे.

या पार्श्वभूमीवर “लढा शेतकऱ्यांच्या हक्कासाठी” या घोषवाक्याखाली तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रशासनाने तातडीने सकारात्मक भूमिका घेत विम्याची प्रलंबित रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा आयोजकांनी दिला आहे. तसेच या आंदोलनात तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन एकजूट दाखवावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

 


Protected Content

Play sound