जळगाव प्रतिनिधी । शेतातील सततची नापिकी आणि आजारपणाला कंटाळून मुळ वनोली ता. यावल येथील प्रौढ शेतकऱ्याने निमखेडी परिसरातील तपोवन मंदिर परिसरात रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सकाळी 8 वाजेच्या सुमारास घडली असून याबाबत तालुका पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शशीकांत मुरलीधर पाटील (वय 55 ह.मु. साईनगर, निमखेडी) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.
सुत्राकडून मिळालेली माहिती अशी की, मूळ यावल तालुक्यातील वनोली येथील रहिवासी शशीकांत मुरलीधर पाटील यांनी दोन वर्षापूर्वी साईनगर येथे नवीन घर घेतले. त्यामुळे वनोली सोडून ते पत्नी संजूबाई व दोन मुले या कुटुंबासमवेत नवीन घरात रहायला आहे. मोठा चंद्रकात हा कंपनीत कामाला तर महेंद्र इलेक्ट्रीकच्या दुकानावर काम करतो. दोघांसह बहिण दिपालीचाही विवाह झाला असून ते मुंबईला नांदते. घरची परिस्थिती हलाखची, त्यातच तीन मुलांचे लग्न केले. त्यांची शेती असल्याने शेतीसाठी बँकेसह हातऊसनवारी, विकास सोसायटीचे असे एकूण 4 ते 5 लाखांचे कर्ज घेतले होते, अपेक्षित उत्पन्न न आल्याने कर्जाची परतफेड करता येत नव्हती. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शशीकांत पाटील ताणतणावात होते. तसेच सततच्या आजारपणाला देखील कंटाळले होते.
असा झाला प्रकार उघड
आज मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे शशिकांत पाटील यांनी पानटपरी उघडली. अर्धा तासानंतर त्यांनी पुन्हा पानटपरी बंद केली. सकाळी दुकानबंद असल्याचे दिसताच शशिकांत पाटील यांच्या भावाला शंका आल्याने त्यांनी घरी विचारणा केली असता ते दुकानाकडेच गेले असल्याचे सांगितले. परंतू ते दुकानावर नसल्याने कुटुंबियांनी शोध सुरु केला. बर्याचवेळ त्याच्याशी संपर्क न झाल्याने कुटुंबियांनी पोलीस स्टेशनला धाव घेतली. याचवेळी धावत्या रेल्वेखाली एकाने आत्महत्या केल्याची माहिती तालुका पोलीसांना मिळाली. शशिकांत पाटील यांच्या कुटुंबियांनी पोलीसांसोबत याठिकाणी धाव घेतल्यानंतर मयत इसम हा शशिकांत पाटीलच असल्याचे निष्पन्न झाले.
लाखोंचे कर्ज
शशिकांत पाटील हे शेतकरी असून त्यांची गावाकडे शेती होती. सततच्या नापिकीमुळे त्रस्त होते. त्यातच त्यांनी दोन्ही मुलांसह मुलीचा विवाह केल्याने त्यांच्यावर कर्ज झाले होते. या कर्जाच्या तणावातून त्यांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज नातेवाईकांनी वर्तविला आहे. घटनेची माहिती कळताच पत्नी, मुलगा चंद्रकांत व महेंद्र यांनी याठिकाणी धाव घेतली. यावेळी जिल्हा सामन्य रूग्णालयात आईसह मुलांचा मन हेलावणारा आक्रोश होता.
खिश्यात आढळली सुसाईड नोट
खांबा क्रमांक ३०२/३४ दरम्यान त्यांचा मृतदेह आढळून आल्यानंतर रेल्वे प्रबंधकांनी तालुका पोलीसांना खबर दिली. तालुका पोलीस स्टेशनचे पोहेकॉ. मगन मराठे, विजय दुसाने यांनी याठिकाणी धाव घेतली. त्यांनी तपासणी केली असता मयताच्या खिश्यात सुसाईड नोट मिळून आली. त्यात आजारपणाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे लिहीले होते.