रानडुकराच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे शेतात काम करीत असताना एका शेतकऱ्यावर रानडुकराने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना गुरुवारी १३ जून रोजी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली आहे. जखमी शेतकऱ्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चंद्रकांत भावलाल पाटील (वय ४३, रा.कुसुंबा ता.जळगाव) असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, चंद्रकांत पाटील हे जळगाव तालुक्यातील कुसुंबा गावात परिवारासह राहतात. शेती काम करून ते परिवाराचा उदरनिर्वाह करतात. कुसुंबा गावचे ते ग्रामपंचायत सदस्य आहेत. गुरुवारी १३ जून रोजी कुसुंबा विमानतळाच्या परिसरात त्यांचे शेत शिवार आहे. या शेतात काम करीत असताना चंद्रकांत पाटील यांना १० ते १२ रानडुकरे दिसली. शेतातील पीक खराब होऊ नये म्हणून त्यांनी त्यांना हुसकवण्याचा प्रयत्न केला असता त्यातील एका रानडुकराने त्यांच्यावर हल्ला करीत पायाचा लचका तोडला. यामुळे गंभीर जखमी झालेल्या चंद्रकांत पाटील यांना आजूबाजूच्या शेतमजूर व ग्रामस्थांनी तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याठिकाणी त्यांच्यावर वैद्यकीय पथकाकडून उपचार सुरु आहेत. दरम्यान, कुसुंबा परिसरात अनेक जंगली प्राणी असून त्यांचा वनविभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी कुसुंबा ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.

Protected Content