मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी संपल्यानंतर आता नव्याने येणा-या विधानसभा निवडणुकांचे सा-यांना वेध लागले आहेत. अशातच आता राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी होण्याची शक्यता आहे. कारण शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरेंची आज भेट घेतली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविकांत तुपकर यांच्यासोबत उद्धव ठाकरेंनी चर्चा केली असून या भेटीला वेगळे महत्त्व असल्याचे बोलले जात आहे. बुलडाणा विधानसभा मतदारसंघात रविकांत तुपकर यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. लोकसभेला बुलढाणा मतदारसंघातून रविकांत तुपकर हे अपक्ष म्हणून उभे राहिले होते. यावेळी त्यांचा निवडणुकीत पराभव जरी झाला असला तरी त्यांनी जवळपास अडीच लाख मते घेतली होती. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत मत विभाजन आणि नुकसान टाळण्यासाठी रविकांत तुपकर यांना सोबत घेण्याच्या दृष्टिकोनातून महाविकास आघाडीत सकारात्मक चर्चा होत असल्याची माहिती आहे.
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यानंतर रविकांत तुपकर यांनी महाराष्ट्र क्रांतिकारी आघाडीची घोषणा केली होती. तर आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये रविकांत तुपकर २५ जागा लढवणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे.