जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शेतात काम करत असतांना मधमाशांनी शेतकरी दाम्पत्यावर हल्ला केल्याने यात शेतकरी पतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना जळगाव तालुक्यातील जवखेडा गावातील शिवारात घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विकास चूडामण पाटील (वय ५५, रा. वडली ता. जळगाव) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील वडली गावात विकास पाटील हे आपल्या पत्नी व दोन मुलांसह वास्तव्याला होते. शेती करून ते आपला उदरनिर्वाह करत होते. गुरुवार १७ ऑक्टोबर रोजी जवखेडा शिवार येथे सकाळी १० ते ११ वाजेच्या दरम्यान शेतात काम करीत असताना अचानक मधमाशांच्या झुंडीने विकास पाटील आणि त्यांची पत्नी रत्नाबाई विकास पाटील (वय ५०) यांच्यावर जबर हल्ला केला. याची माहिती मिळाल्यानंतर जखमी दाम्पत्याला जळगावातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. यात विकास पाटील यांना तपासून मृत घोषीत केले. तर जखमी झालेल्या रत्नाबाई पाटील यांना उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. याघटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलीसांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धाव घेवून माहिती जाणून घेतली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.