जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | परिवर्तन ही सांस्कृतिक उपक्रम करणारी संस्था जळगावच्या सांस्कृतिक विश्वाचा आकार विस्तारणारी आहे. आपल्या गावात विविध चांगली नाटके आणून तसेच स्वतः निर्मिती करून प्रयोग करणारी ही परिवर्तन संस्था आहे, असे मत डॉ शिल्पा बेंडाळे यांनी मनोगतात व्यक्त केले.
परिवर्तन व भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशनच्या वतीने आयोजित मैत्र महोत्सवात चौथ्या दिवशी “मी आणि काशिनाथ घाणेकर” या एकपात्री नाटकाच्या प्रारंभी प्रमुख अतिथी डॉ. शिल्पा बेंडाळे, डॉ. रुपेश पाटील, मनोहर पाटील, डॉ सूर्यकांत विसावे यांच्यासह महोत्सव प्रमुख डॉ. रेखा महाजन, नंदू अडवाणी, प्रकाश पाटील उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला.
साने गुरुजी यांच्या 125 व्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले. तसेच हा नाट्यप्रयोग स्व. पांडुरंग घांग्रेकर यांना समर्पित करण्यात आला. अभिनेते रमेश भिडे यांनी काशिनाथ घाणेकर यांच्या आठवणी, विविध नाटकातील त्यांची स्वगते यांनी रसिक मंत्रमुग्ध झाले. उत्तम संवादफेक, प्रकाश योजना, पार्श्वसंगीत यांचा समर्पक अनुभव प्रेक्षकांनी घेतला. या नाट्यप्रयोगातून गेल्या 50 वर्षातील मराठी रंगभूमीचा इतिहास ही विविध किस्से आणि घटनांतून प्रेक्षकांनी अभिनेते रमेश भिडे यांच्या एकपात्री प्रयोगातून अनुभवली.
मैत्र महोत्सवात आज २५ डिसेंबर रोजी प्रभाकर संगीत कला अकादमीच्या अपर्णा भट कासार आणि त्यांच्या शिष्या सतरंगी कथ्थक नृत्य सायंकाळी ६.३० वाजता भाऊंच्या उद्यानात एम्फी थिएटर येथे सादर करणार आहे. यासाठी रसिकांनी उपस्थिती द्यावी असे आवाहन परिर्वतनतर्फे करण्यात आले आहे.