Home राजकीय प्रसिद्ध गायिका मैथिली ठाकूरची मुंबई महानगरपालिका प्रचारात उडी, मराठी गाण्याने वेधले मतदारांचे...

प्रसिद्ध गायिका मैथिली ठाकूरची मुंबई महानगरपालिका प्रचारात उडी, मराठी गाण्याने वेधले मतदारांचे लक्ष


मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा। राज्यात सध्या महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू असून उमेदवार आणि स्टार प्रचारक रस्त्यावर उतरून मतदारांशी थेट संवाद साधताना दिसत आहेत. येत्या 15 जानेवारी रोजी मतदान तर 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार असून अवघ्या काही दिवसांवर आलेल्या या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. अशा वेळी प्रसिद्ध उत्तर भारतीय गायिका, बिहारच्या आमदार आणि भाजपच्या स्टार प्रचारक मैथिली ठाकूर यांनी मुंबईत दाखल होत प्रचारात उडी घेतली आहे.

मैथिली ठाकूर या मुंबईतील दहिसर येथील वॉर्ड क्रमांक १ मध्ये रोड शो करत असून त्यांच्या प्रचाराची सर्वत्र चर्चा होत आहे. या रोड शोदरम्यान त्यांनी मराठीत गाणे सादर करून उपस्थित मतदारांचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या मराठी गाण्याचे सोशल मीडियावरही कौतुक होत असून, मराठी मतदारांशी थेट भावनिक नाळ जोडण्याचा प्रयत्न त्यांनी या माध्यमातून केला आहे.

प्रचारादरम्यान मैथिली ठाकूर यांनी उत्तर भारतीय आणि मराठी असा भेद न करता एकत्र येऊन विकासासाठी काम करण्याचे आवाहन केले. आम्हाला यूपी, बिहार आणि मराठी असे वेगळे वेगळे करायचे नाही, तर सर्वांनी एकत्र येऊन विकासाच्या दिशेने वाटचाल करायची आहे, असे त्या म्हणाल्या. त्यांच्या या वक्तव्याला उपस्थितांकडून चांगला प्रतिसाद मिळताना दिसून आला.

यावेळी बोलताना मैथिली ठाकूर यांनी खास संदेश देत सांगितले की, लोकांना एकत्र करून विकासाच्या मार्गावर पुढे जाणे गरजेचे आहे. कोणत्याही अडथळ्यांशिवाय पुढे जाण्याचा हा संदेश घेऊन मी मुंबईत आले आहे. मराठीच्या मुद्द्यावर त्या म्हणाल्या की, “अरे भाऊ, तुम्ही असं काय बोलतात, मी पण उत्तर भारतीय मराठी आहे,” असे म्हणत त्यांनी मराठी भाषेबद्दल आपुलकी व्यक्त केली.

राजकीय मुद्द्यांवर बोलताना त्यांनी मुंबईतील विकासाबाबत आपली भूमिका मांडली. कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा भाग झोपडपट्टी म्हणून घोषित केला जाईल, ज्यामुळे लोकांचा विकास होईल, असे सांगितले होते. मुंबई हे माझे दुसरे घर असून मी इथे येत राहीन आणि जात राहीन. भाजप ही जागा चांगल्या पद्धतीने जिंकेल, लोकांना बदल हवा आहे आणि भाजपचा महापौर निवडून येईल, असा विश्वासही मैथिली ठाकूर यांनी व्यक्त केला.

मैथिली ठाकूर या केवळ गायिका नसून आता एक सक्रिय राजकीय व्यक्तिमत्त्व म्हणूनही ओळखल्या जात आहेत. 2025 च्या बिहार विधानसभा निवडणुकीत अलीनगर विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांनी अनुभवी नेते विनोद मिश्रा यांचा पराभव करत विजय मिळवला. राजकारणात येण्यापूर्वी त्या एक लोकप्रिय लोकगायिका म्हणून प्रसिद्ध होत्या. विविध रिअॅलिटी शोमधून त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली असून त्यांचे कार्यक्रम देश-विदेशात होत असतात. आता महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी त्या मुंबईत सक्रिय झाल्या आहेत.


Protected Content

Play sound