स्मिता वाघ यांच्या नावे मनोज जरांगेसंदर्भात फेक पोस्ट व्हायरल; कायदेशीर कारवाई करणार

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरू असताना जळगावाच्या राजकारणातून मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. निवडून आल्यास आपण मनोज जरांगे यांना अटक करणार असल्याची स्मिता वाघ यांची बनावट पोस्ट ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीच्या नावाने सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून भाजपने स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाने करण पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.
स्मिता वाघ यासंदर्भात म्हणाल्या की, मराठा महासंघाने मला पाठींबा जाहीर केला आहे. मराठा समाजाने पाठींबा दिला म्हणून यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. इतक्या खालच्या पातळीवरचे राजकारण विरोधक करत असतील तर जनता यांना कधीच माफ करणार नाही. निवडणूक तोंडावर असताना पराभव समोर दिसू लागल्याने विरोधकांनी राजकारण किती खालच्या पातळीवर नेले आहे हे यातून दिसत आहे. मात्र यासंदर्भात आपण कायदेशीर कारवाई करणार आहे. मी आजपर्यंत पर्यंत जरांगे पाटील साहेबांचे नावे देखील घेतले नाही. जरांगे पाटील यांची भूमिका योग्य आहे. त्यांच्या आंदोलनाला माझा विरोध असण्याचे काहीही कारण नाही. एबीपी माझाचे नाव वापरून जर कोणी अशा पद्धतीच्या पोस्ट व्हायरल करत असेल तर ते योग्य नाही. या लोकांना जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. मी फॉर्म भरल्यानंतर जनतेत जाऊन प्रचाराला सुरुवात केली. जनतेकडून आमचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले जात आहे, असे त्यांनी म्हटले आहे. मला जनतेवर विश्वास आहे की, जनता अशा चुकीच्या पोस्टवर कधीही विश्वास ठेवणार नाही. तुम्हाला बोलायचं तर विकासावर बोला मात्र जातीचा आधार घेऊन बदनामी करणार असाल तर ते योग्य नाही.

Protected Content