जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राज्यातील युवकांना रोजगारक्षम बनवण्यासाठी ९ जुलै रोजी सुरू करण्यात आलेल्या “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना (CMYKPY)” बाबत एक बनावट शासन निर्णय समाजमाध्यमांवर (सोशल मीडियावर) प्रसारित होत असल्याचे १४ जुलै रोजी शासनाच्या निदर्शनास आले आहे. या बनावट निर्णयात सदर योजनेअंतर्गत कार्यप्रशिक्षणाचा कालावधी ५ वर्षे करण्यात आल्याचे म्हटले आहे.
शासनाने स्पष्टपणे कळवले आहे की, हा शासन निर्णय पूर्णतः खोटा असून, शासनाने अशा प्रकारचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. या खोट्या माहितीतून प्रशिक्षणार्थी आणि सर्वसामान्य जनतेची फसवणूक व दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

प्रशासनाने सर्व संबंधित कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सूचित केले आहे की, कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. अशा खोट्या संदेशांमुळे निर्माण होणारा संभ्रम टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी आणि ही बाब आपल्या स्तरावरून संबंधितांच्या निदर्शनास आणून द्यावी. नागरिकांनी अधिकृत शासकीय संकेतस्थळांवरूनच माहिती घ्यावी आणि अपप्रचाराला बळी पडू नये, असे शासनाचे आवाहन आहे.



