पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | लोणीकाळभोर भागात गेल्या पाच वर्षांपासून वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या तोतया डॉक्टरला अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेला डॉक्टर दहावी उत्तीर्ण आहे. लोणी काळभोर भागात तो दवाखाना चालवित असून, त्याने अनेकांवर उपचार केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
प्रकाश रंगनाथ तोरणेअसे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तोतया डॉक्टरचे नाव आहे. याबाबत महापालिकेच्या अधिकारी डॉ. रुपाली रघुनाथ भंगाळे यांनी फिर्याद दिली आहे. तोरणे याचे कदमवाकवस्ती परिसरात जनसेवा क्लिनिक आहे. हवामानातील बदलामुळे अनेकजण सध्या आजारी पडत आहेत. तोरणे याच्या दवाखान्यात रुग्ण मोठ्या संख्येने उपचारसाठी यायचे. तोरणे याच्याकडे वैद्यकीय पदवी नसल्याची माहिती एका नागरिकाने महापालिकेच्या आरोग्य विभागाला दिली होती.
त्यानंतर आरोग्य विभागाचे पथक तोरणे याच्या दवाखान्यात गेले. दवाखान्याचा नामफलकावर तोरणे याचे नाव होते. नामफलकावर तोरणे याने वैद्यकीय पदवीचा उल्लेख केला नव्हता. त्यामुळे आरोग्य विभागाच्या पथकाला संशय आला. आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी तपासणी केली. तेव्हा महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे नोंदणी नसल्याचे उघडकीस आले. चौकशीत तोरणे दहावी उत्तीर्ण असल्याचे उघडकीस आले.