फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावच्या शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयाने पुन्हा एकदा आपली उत्कृष्ट शैक्षणिक परंपरा सिद्ध केली आहे. यावर्षी महाविद्यालयातील एकूण ८ विद्यार्थ्यांनी विद्यापीठ स्तरावर गुणानुक्रमे सर्वात जास्त गुण मिळवत महाविद्यालयाचा आणि परिसराचा गौरव वाढविला आहे. यामध्ये तब्बल पाच विद्यार्थ्यांनी सुवर्णपदके पटकावली आहेत, तर दोन विद्यार्थ्यांनी द्वितीय आणि एका विद्यार्थिनीने तृतीय क्रमांक मिळविला आहे.
धनाजी नाना महाविद्यालयाच्या शिरपेचात सुवर्णतुरा खोवणाऱ्या सुवर्णपदक विजेत्यांमध्ये कु. पौर्णिमा कोळी (बी.ए. हिंदी), कु. छाया सिरसाळ (बी.ए. मानसशास्त्र), कु. माधुरी भरणे (बी.ए. इतिहास), कु. करिष्मा महाजन (एम.ए. हिंदी) आणि कु. नेहा वानखेडे (एम.एस्सी. गणित) यांचा समावेश आहे. या पाचही विद्यार्थ्यांनी संबंधित विषयात विद्यापीठात सर्वाधिक गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे.

इतर उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये कु. मानसी महाजन हिने एम.एस्सी. इनऑरगॅनिक केमिस्ट्री विषयात द्वितीय क्रमांक, तर याच विषयात कु. अचल पाटील हिने तृतीय क्रमांक पटकावला आहे. तसेच, कु. दिपाली रावते हिने बीएस्सी. गणित विषयात विद्यापीठात तृतीय क्रमांक मिळवून महाविद्यालयाचा गौरव वाढवला.
या विद्यार्थ्यांच्या अतुलनीय कामगिरीबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. शिरीषदादा चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, “या यशामुळे धनाजी नाना महाविद्यालयाने पुन्हा एकदा शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध केली आहे. हे यश महाविद्यालयाच्या प्रगत शैक्षणिक धोरणांचे आणि विद्यार्थी-केंद्रित मार्गदर्शनाचे प्रतीक असून प्राचार्य आणि सर्व सहकारी नक्कीच अभिनंदनास पात्र आहेत.”
प्राचार्य डॉ. आर.बी. वाघुळदे यांनी देखील आनंद व्यक्त करताना सांगितले की, महाविद्यालयातील एकूण आठ विद्यार्थी विद्यापीठस्तरावर यशस्वी झाले ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. हे यश विद्यार्थ्यांच्या अथक कष्टाचे आणि प्राध्यापकांच्या समर्पित मार्गदर्शनाचे फलित असून भविष्यातही आमचे विद्यार्थी अशाच प्रकारे यश संपादन करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या यशस्वी विद्यार्थ्यांमुळे पालकांचे, कुटुंबाचे, महाविद्यालयाचे व फैजपूर परिसराचे नाव उंचावले आहे. सर्व पदाधिकारी, सदस्य आणि प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.



