फैजपूर प्रतिनिधी । पालिकेने प्लास्टिक बंदीसाठी नियुक्त केलेल्या पथकाने धडक कारवाई करत शहरातील एका दुकानातून लाखो रुपये किंमतीचा जवळपास 2 हजार किलो प्लास्टिकचा साठा जप्त केल्याने शहरातील व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे. या आधीही याच दुकानावर कारवाई करून 5 हजाराचा दंड भरला होता आता ही कारवाई दुसऱ्यांदा करण्यात आली असल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत माहिती अशी की, शासनाने प्लास्टिक बंदीसाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती व उपाय योजना सुरू केल्या आहे. त्याच पार्श्वभूमीवर फैजपूर शहर प्लास्टिक मुक्त करण्यासाठी पालिकेतर्फे मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका करनिरक्षक बाजीराव नवले व पाणीपुरवठा अभियंता विपुल साळूखे या प्रथक प्रमुखांच्या उपस्थितीत शहरातील मारोती रोडवरील विजय जनरल स्टोअर्स या दुकानावर सायंकाळी 6 वाजेच्या दरम्यान अचानक छापा टाकला. या कारवाईत पथकाने दुकानाच्या तळघरात असलेला लाखो रुपयांचा कॉरिबाग यासह शासनाने बंदी घातलेल्या अन्य प्लास्टिक वस्तूंचा सुमारे 2 हजार किलोचा साठा पथकाने जप्त केला या कारवाईमुळे शहरातील व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली असून आजपर्यत झालेली सर्वात मोठी कारवाई आहे. या कारवाई नंतर तब्बल एक टॅक्टर भरून सर्व प्लस्टिकचा मुद्देमाल पालिकेत आणून पंचनामा करण्यात आला.
यांनी केली कारवाई
या पथकात कारवाई करतांना पालिकेचे कर्मचारी अमोल पाटील, उल्हास चौधरी, बाळू भालेराव, प्रदीप पाराधे, शरद चौधरी, नरेंद्र बाविस्कर, विलास सपकाळे, सुनील कोळी, सुनील ननंदाने, पिटु हस्कर, किशोर वडर, रामा भिरुड, मनोहर चौधरी यासह आरोग्य व सफाई कर्मचारी
कोट –
व्यावसायिकांना पालिकेचे आवाहन
शासनाने प्लास्टिक बंदी केल्यावरही शहरातील अनेक व्यावसायिक प्लास्टिकचा सर्रास वापर करत असल्याने आजची मोठी कारवाई करण्यात आली आहे. आशा प्रकारच्या कारवाई मध्ये सातत्य राहणार असून नागरिकांनी व व्यावसायिकांनी प्लस्टिकचा वापर टाळून प्रशासनास व निसर्गास सहकार्य करावे.
– किशोर चव्हाण, मुख्यधिकारी, फैजपूर