एरंडोल येथे आदर्श नगरात तीन ठिकाणी चोरीचा अयशस्वी प्रयत्न

b0d19e32 4cde 4662 8823 3fb091606977

एरंडोल (प्रतिनिधी) शहरातील नवीन वसाहतीत असलेल्या आदर्श नगरमध्ये काल (दि.१ मे) मध्यरात्री चोरट्यांनी तीन ठिकाणी चोरीचा प्रयत्न केला. मात्र या तीनही ठिकाणी चोरट्यांना कुठलाही किमती ऐवज अथवा मुद्देमाल मिळाला नसल्याने त्यांचा भ्रमनिरास झाल्याची शक्यता आहे. घरफोडीचा प्रयत्न झालेल्या तीनही घरातील रहिवासी बाहेरगावी गेले होते. याबाबत पोलीस स्थानकात कुठलीही नोंद करण्यात आलेली नाही. दरम्यान तीन ठिकाणी घरफोडी करण्याचा प्रयत्न करण्यात आल्यामुळे नवीन वसाहतीतील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

याबाबत माहिती अशी की, शहरातील आदर्श नगरात राहणारे कृषी खात्यातील परमेश्वर चंद्रकांत बेडगे हे परिवारासह बाहेर गावी गेले होते. त्यांचे घर बंद असल्याचा फायदा घेऊन चोरट्यांनी दरवाज्याचे कुलुप तोडुन आत प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील कपाट फोडले, मात्र त्यात काहीही किमती वस्तु आढळुन न आल्यामुळे संतप्त झालेल्या चोरट्यांनी कपाटातील वस्तु अस्ताव्यस्त फेकुन तेथुन पोबारा केला. त्यानंतर चोरट्यांनी वर्धा येथे कार्यरत असलेले पोलीस उपअधीक्षक प्रदीप मैराळे यांच्या बंद घरात घुसण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याच वेळेस वसाहतीतील एक रहिवाशी यास जाग आल्यामुळे तो जागा झाला असल्याचे चोरट्यांना दिसल्यामुळे ते अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. तसेच या कॉलनीतील अन्य एका घरात देखील चोरी करण्याचा प्रयत्नही चोरट्यांनी केला, तो ही अयशस्वी ठरला. शहरात तीन ते चार महिन्यांपुर्वी साई नगरात दोन ठिकाणी व लक्ष्मी नगरात एका ठिकाणी चोरट्यांनी धारदार शस्त्राचा धाक दाखवुन लाखो रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लुटुन नेला होता. शहरात होणा-या चो-यांचा तपास लावण्यात पोलिसांना अपयश येत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातवरण निर्माण झाले आहे. शहरात यापूर्वी अनेक मोटार सायकली चोरीस गेल्या असुन आठवडे बाजारातुन किमती मोबाईलही चोरट्यांनी लंपास केले आहेत. याबाबत पोलिसांनी योग्य ती दखल घेऊन नवीन वसाहत परिसर व शहरातील रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Add Comment

Protected Content