जालना-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून रस्त्यावर उतरलेले मनोज जरांगे यांनी राज्यात निवडणुका जाहीर होताच आपला रोष व्यक्त केला. त्यांनी राज्य सरकारला अनेकदा अल्टीमेटम देऊन देखील त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, त्यानंतर आता मनोज जरांगेंनी संताप व्यक्त केला आहे. आता या निवडणुकीमध्ये निर्णायक मतदान हे मराठ्यांचे आहे, आता रणशिंग फुंकले आहे, लढाईला उतरायचे म्हणजे तलवार काढावी लागेल, घोडा मैदान जिंकायचे आहे, सरकारने मराठा आरक्षणाबाबत सरकारने आमची आशा संपविली आहे असेही मनोज जरांगे यांनी आज म्हटले आहे.
मराठ्यांची दखल घेण्याऐवजी त्यांना बेदखल करण्याचे काम फडणवीसांनी केले आहे. मराठ्यांच्या पोरांचे आयुष्य बेचिराख करण्याचे काम देवेंद्र फडणवीसांनी केले आहे. आमची आयुष्य उध्दवस्त करण्याचे काम सरकारने केले आहे, ज्या मराठ्यांनी त्यांना सत्तेत बसवले त्यांना बेचिराख करण्याचे काम केले आहे. यासाठी देवेंद्र फडणवीसांनी सत्तेचा वापर केला. अशा गोरगरिबांना, कष्टक-यांना, कर्मचारी, शेतकरी, शेतमजूर या बांधवांना जी अपेक्षा होती, सरकार आपल्या लेकरांना शंभर टक्के आरक्षण देईल, मराठ्यांच्या लेकरांचे मुडदे पाडून पापाचा वाटेकरी हे सरकार कधीच होणार नाही. ही आशा होती, ती आशी सरकारने संपवली आहे. सत्तेच्या जोरावर मराठ्यांची मुले भिकारी झाली पाहिजे, या तत्वाने, द्वेषाने आणि आकसाने ते वागले आहेत. त्या पध्दतीने त्यांची ती चाल यशस्वी केली, निर्णय घेणं त्यांच्या हातात होते, त्यांनी निर्णय घेतला नाही ओबीसीच्या १७ जाती घेतल्या पण मराठ्यांना आरक्षण दिले नाही असेही मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.
देवेंद्र फडणवीसांवर आरोप करताना मनोज जरांगे म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळू द्यायचे नाही यासाठीच फडणवीसांनी सुरुवातीपासून खेळी केली. या मराठ्यांची पोरं आरक्षणासापासून, शिक्षणापासून, नोकरीपासून वंचित राहीले पाहिजेत अशा पद्धतीने देवेंद्र फडणवीस मराठ्यांसोबत वागले. सामाजिक चळवळीत वैचारिक मतभेद असू शकतात पण मराठा समाज एक ठेवायचा नाही, मराठा समाजाच्या पोरांना आरक्षण न देता भिकारी ठेवण्याचे काम फडणवीस यांनी केले. देवेंद्र फडणवीस द्वेषाने वागले. मराठ्यांच्या शेपटावर त्यांनी पाय ठेवला.
मराठ्यांना फडणवीस यांची खुन्नस कळाली होती. आम्ही मराठ्यांना बाजूला ठेऊन सत्तेवर बसू असे देवेंद्र फडणवीसांनी ठरवले आहे. देवेंद्र फडणवीस आम्हाला आरक्षण देतील असा आम्ही विश्वास ठेवला होता. शेवटी त्यांनी बरबटलेले विचार त्यांनी बाहेर आणलेच. मराठ्यांना बाजूला ठेवण्यासाठी फडणवीस यांनी डाव रचले. त्यांच्या १७ पिढ्या आल्या तरी मराठ्यांना बाजूला ठेऊन ते सत्तेवर कधीच येऊ शकत नाही. इथे सर्व जातींचा प्रश्न आहे. हात जोडून सर्व समाजाला विनंती करतो, आपल्या समाजाला बळ द्यायचे काम करा. यावेळी मराठ्यांचे १०० टक्के मतदान झाले पाहिजे. मराठ्यांचे एकही मतदान घरी राहता कामा नये.